जळगाव : यावल येथील जे.टी.महाजन सूतगिरणी खरेदीसाठी भरलेली दोन कोटी ७९ लाख २८ हजार ७५० रुपये ही २५ टक्के रक्कम लक्ष्मी टेक्सटाईल्सला (धरणगाव) नियमबाह्य परत करुन जिल्हा बॅँकेची फसवणूक व अपहार केला म्हणून बॅँकेचे तत्कालीन चेअरमन व राष्ट्रवादीचे आमदार डॉ.सतीश भास्करराव पाटील यांच्यासह आठ जणांविरुध्द मंगळवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुतगिरणीवर बॅँकेचे प्राधिकृत अधिकारी असलेले एस.झेड.पाटील यांनी २५ टक्के रक्कम लक्ष्मी टेक्सटाईल्सला परत करण्याची शिफारस केली होती. ही रक्कम परत करण्याबाबत कोणताही ठराव संचालक मंडळाने केलेला नव्हता. त्यानंतरही ही रक्कम परत करण्यात आली. ही प्रक्रीया सन २०११ मध्ये झाली आहे. या प्रकरणी फसवणूक झाल्याची फिर्याद अॅड.विजय भास्कर पाटील यांनी दिली होती. दरम्यान, महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चॅलेंज पूर्ण केले. कारखाना चालवायला देणे किंवा पैसे परत करणे हे दोनच पर्याय बॅँकेकडे होते. त्यानुसार पैसे परत केले. यात चुकीचे काहीच झाले नाही, असे पाटील म्हणाले, तर गुन्हा दाखल होण्याशी काहीही संबंध नाही. गैरव्यहार झाला, पुरावे समोर आले म्हणून हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली. नियमबाह्य कामे करणाऱ्यांची अशीच गत होत असते, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. (प्रतिनिधी)
सतीश पाटील यांच्यावर गुन्हा
By admin | Published: April 21, 2016 5:08 AM