जळगाव : नोटाबंदीच्या काळात सुमारे ७३ लाख ३२ हजार रुपयांच्या जुन्या नोटा बेकायदेशीरपणे बदलून दिल्याचा प्रकार जिल्हा बँकेच्या चोपडा शाखेत उघडकीस आला आहे. बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, चोपडा शाखेचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर पाटील व रोखपाल रविशंकर गुजराथी यांच्यासह अज्ञात व्यक्तींविरुध्द सीबीआयने गुरुवारी फसवणूक व लाचलुचपत विषयक गुन्हा दाखल केला. सीबीआयच्या विशेष पथकाने गुुरुवारी बँकेच्या मुख्य शाखेसह चोपडा शाखा व देशमुख यांच्या निवासस्थानी झडती व चौकशीसत्र राबविले. शताब्दी वर्षात शेतकऱ्यांच्या ‘दगडी बँकेत’ घडलेल्या या घोटाळ्याने सहकार क्षेत्रात खळबळ माजली आहे. माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या कन्या अॅड.रोहिणी खडसे -खेवलकर अध्यक्ष असलेल्या या बँकेत सर्वपक्षीय नेते संचालक मंडळात सहभागी आहेत. यापूर्वी याचप्रकरणी सीबीआय व नाबार्डचे अधिकारी चौकशीसाठी येऊन गेले होते. त्यावेळी ही नियमित चौकशी असल्याचा निर्वाळा चेअरमन व संचालक मंडळाने दिला होता. रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघननोटा बदलवून देताना रिझर्व्ह बॅँकेच्या मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन केल्याचा ठपका जितेंद्र देशमुख यांच्यावर ठेवला आहे. सीबीआयने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख यांच्या सूचनेवरुन जिल्हा बॅँकेच्या चोपडा शाखेत नोटाबंदीच्या काळात ९ नोव्हेंबर रोजी सुमारे ७३ लाख ३२ हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यात येऊन त्याऐवजी १०० रुपयांच्या नोटा देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)>१० तास चौकशी : जळगावात दाखल झालेल्या पथकाने सकाळी नऊ ते संध्याकाळी सात अशी तब्बल १० तास बॅँकेत चौकशी केली. नाश्ता व जेवण देखील या अधिकाऱ्यांनी जागेवरच घेतले.सीबीआयने दिलेल्या तक्रारीत कार्यकारी संचालक व अन्य दोन जणांविरुध्द भादवि कलम १२० ब (कट रचणे),४२०-(फसवणूक करणे),४६८-(बनावटीकरण), ४७१ (बनावट असल्याची माहिती असतानाही खरी म्हणून वापरणे), ४७७-अ (खोटे हिशेब तयार करणे) १३ (२) १३ (१) (ड) पी.सी.अॅक्ट १९८८ (लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम) या प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
कार्यकारी संचालकांसह तिघांविरुद्ध गुन्हा
By admin | Published: March 03, 2017 5:49 AM