मुंबई : दलालांकडून रेल्वेच्या ई-तिकिटांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार केले जात असल्याचे उघडकीस येत आहे. हे दलाल बोगस ओळखपत्र तयार करून प्रवाशांसाठी अनधिकृतपणे तिकिटे काढत असल्याचे आरपीएफच्या निदर्शनास आले असून, या गैरप्रकारांना अद्यापतरी आळा घालता आलेला नाही. त्यामुळे हे गैरप्रकार थांबविण्यासाठी दलालांबरोबरच प्रवाशांवरही गुन्हा दाखल करण्याचा विचार आरपीएफकडून केला जात आहे. पश्चिम रेल्वे आरपीएफकडून तशी शिफारस करण्यावर काम सुरू असून, लवकरच रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे. आॅनलाइन आरक्षणातील गैरप्रकार रोखण्यासाठी घेण्यात आलेल्या कार्यशाळेत ई-तिकिटांमधील दलाली रोखण्यासंदर्भात काही शिफारशी आरपीएफकडून कार्यशाळेत मांडण्यात आल्या आणि कार्यवृत्तही तयार केले. यामध्ये प्रवाशांवरही गुन्हा दाखल करण्याची महत्त्वाची शिफारस करण्यात आली. आतापर्यंत दलाल पकडल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करून दंडात्मक कारवाई केली जात होती; आणि दंड न भरल्यास जेलची हवा खावी लागते. मात्र याच दलालांकडून तिकीट घेणाऱ्या प्रवाशांवर कुठलाही गुन्हा दाखल होत नव्हता. त्यांच्यामुळे दलालांना अधिक प्रोत्साहन मिळत असल्याने थेट प्रवाशांवरच गुन्हा दाखल केल्यास अनधिकृतपणे ई-तिकीट घेण्यास प्रवासी घाबरतील आणि एक भीती प्रवाशांमध्ये निर्माण होईल. त्यामुळे प्रवाशांवरही गुन्हा दाखल करण्याची शिफारस या कार्यशाळेत केली गेल्याचे पश्चिम रेल्वे आरपीएफचे (मुंबई विभाग) वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त आनंद झा यांनी सांगितले.
...तर प्रवाशांवरही गुन्हा
By admin | Published: April 03, 2015 2:20 AM