औरंगाबाद : औरंगपुऱ्यातील जिल्हा परिषद मैदानावरील फटाका बाजाराला २९ आॅक्टोबर रोजी लागलेल्या आगप्रकरणी शनिवारी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात दोन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. नफा कमविण्यासाठी असोसिएशनने नियम पायदळी तुडविल्याचे चौकशीत स्पष्ट झाले असल्याचे पोलिसांनी सांगितले. औरंगाबाद शहर फायर वर्कर्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष विलास पूनमचंद खंडेलवाल आणि अन्य पदाधिकारी तसेच संभाजीनगर फटाका असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. २९ आॅक्टोबर रोजी जि. प. मैदानावरील फटाका बाजार आगीत बेचिराख झाला. या भीषण दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. मात्र तेथील १४० दुकाने, ११२ वाहने जळून खाक झाल्याने कोट्यवधीच्या राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान झाले होते. घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी चौकशी करण्याचे आदेश गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना दिले होते. शिवाय महानगरपालिका अग्निशमन दलानेही त्यांच्या स्तरावर या घटनेचा तपास केला.दोघांच्याही तपासात अनेक गंभीर बाबी समोर आल्या आहेत. जि. प. मैदानावर फटाक्यांची दुकाने थाटण्यासाठी औरंगाबाद फायर वर्कर्स डीलर्स असोसिएशन व संभाजीनगर फटाका असोसिएशन यांनी पोलीस आयुक्त, महानगरपालिका यांच्याकडून परवानगी घेतली होती. हा परवाना घेताना अग्निशमन दलाने घातलेल्या अटी आणि शर्र्तींचे पालन करण्याचे लेखी वचनही त्यांनी दिले होते. एवढेच नव्हे तर, घटनेच्या एक दिवस आधी पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत पदाधिकाऱ्यांनी फटाका बाजारात कोणतीही दुर्घटना होणार नाही, अशी ग्वाही दिली होती. प्रत्यक्षात मात्र व्यापारी असोसिएशनने सुरक्षेची उपाययोजना केली नव्हती. अत्यंत धोकादायक पद्धतीने जि. प. मैदानावर १४० दुकाने थाटण्यात आली होती. अग्निविरोधी यंत्रणा, दोन दुकानांमध्ये चार फूट अंतर ठेवण्याचे नियम पायदळी तुडविण्यात आले. जीविताला धोका पोहोचेल, अशा पद्धतीने ही दुकाने थाटण्यात आल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)
दोन असोसिएशनविरुद्ध गुन्हा
By admin | Published: November 07, 2016 6:06 AM