जमीर काझी,मुंबई- दोघा पोलीस कॉन्स्टेबलकडून एका तरुणीच्या छळप्रकरणाचा तपास गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला आहे. संबंधित तरुणीचा जबाब नोंदवून पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, कॉन्स्टेबल तुषार तिऊरवडे याची सहआयुक्त (प्रशासन) कार्यालयातून हकालपट्टी करण्यात आली असून, राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाने या प्रकरणाची नोंद घेतली आहे.मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल तुषार तिऊरवडे व संतोष कदम यांच्याकडून तरुणीचे शोषण केल्याप्रकरणाचे वृत्त ‘लोकमत’ने सोमवारी दिले होते. कोकण परिमंडळाचे विशेष महानिरीक्षक प्रशांत बुरडे यांच्याकडे कार्यरत असलेल्या कॉन्स्टेबल कदमच्या ‘कार्यपद्धती’ची अनेक प्रकरणे अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’कडे मांडली. कल्याणमध्ये राहात असलेल्या धनश्री (बदललेले नाव) या तरुणीच्या नवऱ्याने परस्पर दुसऱ्याशी विवाह केल्याने त्याबाबत तक्रार देण्यासाठी आली असता कॉन्स्टेबल तुषार तिऊरवडे तिच्या संपर्कात आला. लग्न करण्याचे आमिष दाखवित शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून गर्भवती झाल्याने धनश्रीने लग्नाचा आग्रह धरल्यानंतर टाळाटाळ करू लागला. तिला मारहाण करून गर्भपात घडविला. त्याचा पोलीस मित्र संतोष कदम याच्या सहकार्याने दमदाटी करीत दोघांनी या प्रकरणाची कोठेही वाच्यता न करण्यास तिला धमकाविले. त्याचप्रमाणे कार्यरत असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा नावाचा वापर करून भोईवाडा पोलिसांकडून खोटी कारवाई करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार देऊनही काहीच कार्यवाही न झाल्याने पीडित तरुणीने ‘लोकमत’कडे व्यथा मांडल्या. हे वृत्त छापून आल्याने दिवसभर पोलीस वर्तुळात चर्चेचा विषय बनला. पोलीस आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपविली. तर सहआयुक्त (प्रशासन) अनुपकुमार सिंग म्हणाले, ‘कॉन्स्टेबल तिऊरवडे याला आपल्या कार्यालयातून परत ‘एल’ विभागात परत पाठविले आहे. संबंधित तरुणीचा अर्ज परिमंडळ-४कडे पाठवला आहे.राज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणाने पीडित तरुणीला तक्रार देण्यासाठी बोलाविले आहे. तिच्या जबाबानंतर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे प्राधिकरणाचे सदस्य व निवृत्त अपर पोलीस महासंचालक पी. के. जैन यांनी सांगितले. कॉन्स्टेबल संतोष कदम हा सुमारे १५ वर्षांपासून आयपीएस प्रशांत बुरडे यांच्याकडे कार्यरत आहे. त्यांच्या अत्यंत विश्वासातील कर्मचारी असल्याचे सांगण्यात आले. तो परिमंडळाच्या कार्यक्षेत्रातील चारही जिल्ह्यांतील पोलीस अधिकारी, तक्रारदार, फिर्यादी, आरोपी यांच्या नेहमी संपर्कात असतो. त्याचे मोबाइलचे रेकॉर्ड तपासल्यास याबाबत अनेक बाबी उघड होतील, तसेच त्याच्या संपत्तीची चौकशी ‘एसीबी’कडून करावी, त्यातून धक्कादायक माहिती पुढे येईल, असे अनेक अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.>हाउस आॅर्डलीची ड्युटी मात्र कोकण भवनात कॉन्स्टेबल कदम हा मुंबई आयुक्तालयात नियुक्ती असली तरी तो ड्युटी मात्र आयजी बुरडे कार्यरत असलेल्या कोकण परिमंडळाच्या कार्यालयात करतो. याबाबत सशस्त्र विभागाच्या अपर आयुक्त अस्वती दोरजे यांनी सहा महिन्यांपूर्वी नोटीस बजाविली होती. मात्र तो बुरडे यांच्या मलबार हिल येथील निवासस्थानी ‘हाउस आॅर्डली’ असल्याचे कागदोपत्री दर्शवित त्याला पुन्हा त्याच ठिकाणी कार्यरत ठेवण्यात आले आहे.
तरुणीच्या शोषणाची क्राइम ब्रॅँचकडून चौकशी
By admin | Published: February 28, 2017 4:44 AM