नागपूर : महापौरांवर झालेल्या हल्ल्याची क्राइम ब्रांचमार्फत चौकशी करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. गुंडगिरी करणाऱ्यांचा मुलाहिजा बाळगणार नाही. पोलीस आयुक्तांकडून माहिती घेतली असून, आज महापौरांना भेटणार असल्याचंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याची मागणी केली आहे. ही अत्यंत गंभीर अशा प्रकारची बाब आहे, जर महापौर सुरक्षित राहणार नसतील, तर याची गांभीर्यानं दखल घेण्याची आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या आरोपींना तात्काळ अटक झाली पाहिजे. त्यासाठी सरकारवर दबाव आणणार असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं आहे. दरम्यान, बाईकवरून आलेल्या दोन अज्ञात हेल्मेटधारी हल्लेखोरांनी मध्यरात्री महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर देशी कट्ट्यातून बेछूट गोळीबार केला. गोळ्या गाडीवर लागल्याने जोशी या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. हल्लेखोरांनी एकामागोमाग एक अशा चार गोळ्या झाडल्या आणि पसार झाले. ही घटना अमरावती आऊटर रिंग रोडवर मंगळवारी मध्यरात्री 12 वाजून 5 मिनिटांच्या सुमारास घडली. या घटनेने संपूर्ण नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.महापौर संदीप जोशी वर्धा मार्गावरील जामठा येथील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनजीकच्या रसरंजन धाब्यावरील स्वत:च्या लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून 12च्या सुमारास कुटुंबीय व आपल्या मित्रासह नागपूर शहराकडे परत येत होते. धाब्यावरून 7 गाड्या नागपूरच्या दिशेने निघाल्या. त्यांचे कुटुंबीय व मित्रमंडळीच्या गाड्या पुढे होत्या. तर सर्वात मागे जोशी यांची गाडी होती. संदीप जोशी फॉर्च्युनर गाडी चालवित होते. नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटनजीकच त्यांच्या गाडीवर अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीवार केला. हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या.
महापौरांवर झालेल्या हल्ल्याची क्राइम ब्रांचमार्फत चौकशी करणार- उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 12:42 PM