मुंबई : नवनिर्वाचित २८८ आमदारांपैकी तब्बल १६५ जणांवर विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून त्यातील ११५ जणांवर हत्या, खुनाचा प्रयत्न, खंडणी व दरोडा तसेच अपहरणासारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. ‘असोसिएशन फॉर डेमॉक्रेटीक रिफॉर्म्स’ या संस्थेने सादर केलेल्या अहवालात ही माहिती दिली आहे. संस्थेने नवनिर्वाचित २८८ आमदारांच्या आर्थिक, शैक्षणिक आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीचा अभ्यास करून हा अहवाल सादर केला आहे. २००९च्या तुलनेत यंदा निवडून आलेल्या आमदारांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांचा टक्का वाढल्याचे ‘एडीआर’च्या अहवालात म्हटले आहे. गेल्यावेळच्या तुलनेत यंदा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आमदारांचा टक्का ५२वरून ५७ झाला आहे. तर, गंभीर गुन्ह्यांची नोंद असणाऱ्यांची संख्या ३३ टक्क्यांवरून ४० टक्क्यांवर पोहोचली आहे. भाजपाच्या १२२पैकी ४६ आमदारांवर विविध प्रकारच्या गुन्ह्यांची नोंद आहे. तर, शिवसेनेच्या ६३ पैकी ३५ आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. टक्केवारीच्या दृष्टीने शिवसेनेत सर्वाधिक ५६ टक्के आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. राष्ट्रवादीचे ४४ टक्के तर काँग्रेसच्या २४ टक्के आमदारांवर गुन्हे दाखल आहेत. (प्रतिनिधी)
नवनिर्वाचित १६५ आमदारांवर गुन्हे
By admin | Published: October 24, 2014 4:24 AM