पांढरकवडा (जि़ यवतमाळ) : विधानसभा उपाध्यक्ष आमदार वसंत पुरके यांच्या ओएसडीसह (आॅफिसर आॅन स्पेशल ड्युटी) तिघांविरुद्ध बुधवारी पांढरकवडा पोलीस ठाण्यात बहुचर्चित जनरेटर खरेदी घोटाळ्यात विविध कलमांअन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.सारंग कोंडलकर, असे या ओएसडीचे नाव आहे. ते मुळात उपविभागीय महसूल अधिकारी आहेत. सध्या ते आमदार पुरके यांचे ओएसडी म्हणून कार्यरत आहेत. सन २०११ मध्ये ते आदिवासी विकास विभागात पांढरकवडा येथे प्रकल्प अधिकारी म्हणून प्रतिनियुक्तीवर होते. कोंडलकर यांच्यासह अमरावतीचे तत्कालीन आदिवासी विकास अपर आयुक्त व्ही. जे. वरवंटकर, जे. एस. एन्टरप्राइझेस मुंबईचा मालक शब्बीर अली मौसीद अली यांच्यांविरुद्ध पांढरकवडा पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अकोला येथील पोलीस उपअधीक्षक यू. के. जाधव यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली. पांढरकवडा प्रकल्पांतर्गत येणाऱ्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्युतीकरणासाठी जनरेटरचा पुरवठा करण्याचे ठरले होते. त्यासाठी २० मार्च २०११ ते ३१ मार्च २०११ या काळात जनरेटरची खरेदी करण्यात आली. त्याकरिता बनावट कागदपत्रेही तयार केली गेली. त्यात २९ लाख १६ हजार ४८० रुपयांचा भ्रष्टाचार केला गेला. या प्रकरणात शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले. अमरावती अपर आयुक्त यांच्या स्तरावर सुमारे दोन कोटी रुपयांचा जनरेटर खरेदी घोटाळा झाला आहे. अमरावतीचे माजी आमदार जगदीश गुप्ता यांनी सर्वप्रथम यासंबंधी विभागीय महसूल आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती. (प्रतिनिधी)
विधानसभा उपाध्यक्षांच्या ओएसडीवर गुन्हा
By admin | Published: August 14, 2014 3:21 AM