मुंबई : राज्यात विजेच्या मागणीत वाढ नोंदविण्यात येत असून, सध्याची उच्चतम मागणी आहे. त्यानुसार विजेचा पुरवठा करताना दमछाक होत असतानाच वीज चोरांविरोधात धडक मोहीम राबविण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यानुसार, अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्रांकडे लक्ष देऊन त्या रोहित्राची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासणी केली जाणार आहे. वीजचोरी आढळ्यास वीजचोरांवर अदखलपात्र व अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात येणार आहे.
वाढत्या उन्हाची तीव्रता व कोरोना काळानंतर उद्योगांकडून वाढलेल्या वीज मागणीला पुरवठा करताना पुरेसा कोळसा उपलब्ध होत नाही. त्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी भारनियमन केले जात आहे. अशात विजेची चोरी होऊ नये म्हणून महावितरण सज्ज झाले आहे. या पार्श्वभूमीवर अतिभारीत वीज वाहिन्यांवरील रोहित्रांकडे विशेष लक्ष देऊन त्या रोहित्राची क्षमता व त्याच्यावरील वीजभार तपासण्याची मोहीम राज्यभर राबविण्यात येणार आहे. या रोहित्रांवर वीजचोरी आढळल्यास संबंधित ग्राहकांविरुध्द कडक कारवाई केली जाणार आहे. महावितरणच्या संचालक विभागाचे संचालक संजय ताकसांडे यांनी गुरुवारी घेतलेल्या बैठकीत विजेची चोरी किंवा अनधिकृतपणे विजेचा वापर करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले.
- प्रत्येक जिल्ह्यातील रोहित्रांवर मंजूर भारापेक्षा जास्त भार असल्यास अशा सर्व रोहित्रांची तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.- ग्राहकांनी वीजचोरी केली असल्यास वा वीज यंत्रणेवर आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्याविरुध्द कारवाई करून त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात यावा. - वीजचोरी करणाऱ्या ग्राहकांवर अदखलपात्र व अजामीनपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात यावी, असे आदेश देण्यात आले आहेत.