मुंबई : भाजपा उमेदवाराच्या विनापरवाना सुरू असलेल्या प्रचार फेरीवरून सायन कोळीवाडा परिसरात शिवसेना-मनसेत राडा झाला. या राड्यात पोलिसांना धक्काबुकी झाली. या प्रकरणी अण्टॉपहील पोलिसांनी सरकारी कर्मचाऱ्यास दुखापत केल्याप्रकरणी भाजपा उमेदवारासह त्याच्या २५ ते ३० कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे. सायन कोळीवाड्यातील भाजपाचे आमदार कॅप्टन तमील सेल्वन यांचे बंधू मुरगन सेल्वन यांना भाजपाकडून १७६साठी उमेदवारी देण्यात आली. बुधवारी मुरगन यांनी पुणे येथील बालाजी महाविद्यालयातील काही मुलांना प्रचारासाठी आणले होते. सुटाबुटात आलेले हे विद्यार्थी घरोघरी प्रचार करत होते. मात्र ते परवानगीशिवाय फिरत असल्याची माहिती मिळताच शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेतली. त्यांच्या प्रचाराला अटकाव घातल्याने वातावरण तापले होते. मुरगन यांच्या कार्यकर्त्यांनीही तेथे धाव घेतली. शिवसेना आणि मनसेसोबत त्यांची शाब्दिक चकमक उडाली. शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला होता. (प्रतिनिधी)
‘त्या’ उमेदवाराविरुद्ध गुन्हा
By admin | Published: February 17, 2017 3:17 AM