ठाणे : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल ठाण्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष अविनाश जाधव आणि अभिजित पानसे यांच्यासह १९ गोविंदा पथकांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यातगुन्हे दाखल झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ठाण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने येथील भगवती शाळेजवळील मैदानात ९ थर लावणाऱ्यांना ११ लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. सकाळी ११ ते दुपारी २.३० च्या दरम्यान या हंडीच्या ठिकाणी गोविंदा पथकांमधील १८ वर्षांखालील मुलांना सहभागी केले. तसेच दहीहंडी फोडण्याकरिता लावण्यात आलेल्या थरांची उंची २० फुटांपेक्षा जास्त असल्याने फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ६८ प्रमाणे नोटीसनुसार उत्सवाचे आयोजक जाधव आणि पानसे यांच्यासह १९ गोविंदा पथकांविरोधात भा.दं.वि.स. कलम ३०८, ३३६, १८८, ३४ नुसारगुन्हे दाखल झाले आहे. >गुन्हे दाखल झालेल्या गोविंदा पथकांची नावे जागृत हनुमान चौक, जोगेश्वरी (७ थर), किसननगरचा राजा, ठाणे (७ थर), आई जीवदानी पथक, विरार (८ थर), नवतरुण मित्र मंडळ, ठाणे (६ थर व १८ वर्षांखालील गोविंदा), ओमसाई मित्र मंडळ, शांतीनगर (७थर आणि १८ वर्षांखालील गोविंदा), म्हाडा गोविंदा पथक (७ थर), एकता मित्र मंडळ (६ थर), वीर संभाजी मंडळ (६ थर आणि १८ वर्षांखालील गोविंदा), श्रीसाई दहीकाला उत्सव मंडळ, ठाणे (६ थर), नवतरुण मित्र मंडळ (६ थर (दोन वेळा), बेस्टचा राजा मुंबई (६ थर), बालवीर मंडळ (६ थर), बाळाराम स्मृती ( ६ थर), शिवशाही मित्र मंडळ (७थर आणि १८ वर्षांखालील गोविंदा), शिवसाई मित्र मंडळ (९ थर, दोन वेळा), जय जवान मित्र मंडळ (९ थर आणि १८ वर्षांखालील गोविंदा)>‘‘या ठिकाणी दुपारपर्यंत व्हिडीओ कॅमेऱ्यांद्वारे केलेल्या चित्रीकरणात २३ गोविंदा पथकांचे चित्रीकरण झाले होते. १६ पथकांसह आयोजकांविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये पाच पथकांनी लहान मुलांचा वापर केल्याचे समोर आले. तसेच तपासाअंती पथकांना उंचचउंच थर लावण्याकरिता प्रोत्साहन देणाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल होऊ शकतो.’’- भरत शेळके, सहायक पोलीस आयुक्त >ठाणे, मुंब्रा येथे ४ जण जखमी ठाणे व मुंब्रा येथे दहीहंडीत सहभागी झालेले दोन गोविंदा तसेच दोन बघे जखमी झाले. मनीषानगर, कळवा येथील गोविंदा पथकातील भूषण नेरकर (३८) यांच्या डोक्याला जखम झाली आहे, तर खारटन रोड येथे दहीहंडी पाहत असताना प्रशांत भोईर (२०) यांच्या डोक्यात हंडीचा काही भाग पडून ते जखमी झाले. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंब्रा, आनंदनगर कोळीवाडा येथे मिथिलेश मिश्रा (११) हा दहीहंडी पाहत असताना डोक्यात नारळ पडून जखमी झाला, तर मुंब्रा मार्केटमध्ये एक गोविंदा जखमी झाला.>खड्ड्यात पडून गोविंदा जखमीडोंबिवली : गोपाळकाल्याच्या दिवशी दहीहंडीचे उंचउंच थर लावताना गोविंदा पडून जखमी होतात. मात्र, गुरुवारी सकाळी गौरव राजभर (१७, रा. डोंबिवली) या गोविंदाची दुचाकी आजदेगाव येथील खड्ड्यात आदळल्याने तो खाली पडला. त्यात त्याच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्याला मित्रांनी महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. त्याच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याने त्याला बॅण्डेज करू न अधिक उपचारासाठी सायन रु ग्णालयात हलवण्यात आले.राजभर दुचाकीवरून हंडी फोडण्यासाठी डोंबिवलीत फिरत होता. त्या वेळी आजदेगाव येथे ही घटना घडली. त्यामुळे त्याच्या गोविंदा पथकाने महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. दरम्यान, दिवसभरात आणखी दोन गोविंदा जखमी झाले. कल्याणमधील निशांत पाटील याच्या हाताला दुखापत झाली. त्याला रुक्मिणीबाई रुग्णालयात नेण्यात आले. तर डोंबिवलीत समाधान सोनावणे याच्या हाता-पायाला लागल्याने शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.दरम्यान, याअगोदर खड्ड्यात पडून डोंबिवलीत दोन महिला आणि एक ज्येष्ठ नागरिक जबर जखमी झाले होते. कल्याण-मलंग रस्त्यावर द्वारली गावाजवळ खड्ड्यामुळे एका तरुणीला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्षांचे नेते आता तरी खड्ड्यांकडे लक्ष देतील का, असा असा सवाल नागरिक करत आहेत.
१९ गोविंदा पथकांवर गुन्हे दाखल
By admin | Published: August 26, 2016 2:51 AM