मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी न करणाऱ्या महाविद्यालयांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. उच्च शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज ही माहिती दिली.शिक्षण शुल्काच्या केवळ ५० टक्के इतकी रक्कम विद्यार्थ्यांकडून घ्यावी अन्य ५० टक्के रक्कम सरकार देणार आहे. परंतु काही महाविद्यालयांमध्ये १०० टक्के शुल्क विद्यार्थ्यांकडून घेण्यात येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, अशा संस्थांविरुध्द नियमानुसार तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी विभागनिहाय नोडल अधिकाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही. याची दक्षता सरकार घेत आहे, असे तावडे यांनी पत्रकारांना सांगितले.८ लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांकडून पूर्ण फी घेणे बेकायदेशीर असून, महाविद्यालयांनी ५० टक्के पेक्षा जास्त शुल्क आकारु नये, असे आदेश सर्व महाविद्यालयांना आणि शैक्षणिक संस्थांना यापूर्वीच दिले आहेत. तरीही विद्यार्थ्यांकडून अधिक शुल्क घेतले असल्यास अथवा कोणत्याही विद्याथ्यार्ची फसवणूक झाली असल्यास, त्या विद्यार्थ्यांनी विभागीय नोडल अधिकाºयांकडे आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन तावडे यांनी केले.
मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती न दिल्यास गुन्हे दाखल करु; शिक्षणमंत्र्यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 1:40 AM