ठाणे : महापालिकेत शुक्रवारी महासभेच्या दरम्यान विक्रांत चव्हाण आणि राजन किणे या काँग्रेसच्या दोन नगरसेवकांसह त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारी प्रकरणी सुरक्षारक्षकांनी शनिवारी रात्री नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.ठाणे महापालिकेच्या आवारात १५ मे रोजी दुपारी २.३० ते ३ वा.च्या दरम्यान हा प्रकार घडला होता. तत्पूर्वी, पालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महासभेदरम्यान काँग्रेसचे वर्तकनगर येथील नगरसेवक चव्हाण आणि मुंब्य्रातील नगरसेवक किणे यांच्यात क्षुल्लक कारणावरून शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर दोघांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करून मारहाण केली. पालिकेचे प्रभारी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या आदेशानंतर प्रभारी सुरक्षा अधिकारी सुक्राम जाधव यांनी याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात हाणामारी करणे, दंगल माजविणे, शिवीगाळ करणे या कलमांखाली १६ मे रोजी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक के.आर. खरात हे अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
हाणामारी करणाऱ्या नगरसेवकांवर गुन्हा दाखल
By admin | Published: May 18, 2015 4:04 AM