यवतमाळ - कीटकनाशकांच्या फवारणीमुळे यवतमाळ जिल्ह्यात आत्तापर्यंत १८ शेतकरी, शेतमजूर दगावले. ४५० जणांवर उपचार करून सुटी देण्यात आली. यात दोषी आढळणा-या कीटकनाशक कंपन्या आणि त्यांची विक्री करणा-या कृषी केंद्र चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश उच्चाधिकार समितीला दिल्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. फवारणीमुळे विषबाधित झालेल्या शेतक-यांची भेट आणि मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी कुटुंबियांना सांत्वना देण्यासाठी खोत बुधवारी जिल्हा दौ-यावर आले होते. त्यांनी आर्णी तालुक्यातील शेंदुरसणी येथील मृत शेतक-याच्या कुटुंबाला भेट देऊन त्यांच्या शेताची पाहणी केली. नंतर यवतमाळ येथील शासकीय रूग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल विषबाधित शेतक-यांची वास्तूपूस केली. तत्पूर्वी त्यांना शेतकरी संघर्ष समितीने निवेदन सादर केले. हे निवेदन स्वीकारत असतानाच एका इसमाने त्यांच्या अंगावर फवारणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच त्याला रोखले. नंतर पत्रकार परिषदेत त्यांनी विषबाधा प्रकरणी चौकशीसाठी गृह सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन झाली असून आपण आपल्या दौºयाचा अहवाल समितीला सादर करणार असल्याचे सांगितले. ना. खोत म्हणाले, उपचार करून घरी परतलेल्या विषबाधितांना रूग्ण कल्याण समितीतून आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत. कपाशीचे बीजी-२ हे वाण कीडींना बळी पडत असल्याने त्याला केवळ संकरित वाण म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविणार आहे. यामुळे बीजीच्या किंमती कमी होतील. आता प्रत्येक गावात कृषी ग्राम समिती स्थापन केली जाईल. या समितीकडे तक्रारी करता येईल, असेही त्यांनी सांगितले. फवारणीमुळे विषबाधा होणे ही कृषी विभागाची जबाबदारी असल्याचे त्यांनी कबूल केले. मात्र अडीच महिन्यांपूर्वी जुलै महिन्यात या घटनांना सुरूवात होऊनही आरोग्य विभागाने याची माहिती का दडविली?, इतर विभागांनीही माहिती का दिली नाही याची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी डॉ. राजेश दुशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले आदी उपस्थित होते. ऊसाचे औषध कपाशीवर कसे ?‘उलीस’ नामक औषधाचा ऊसासाठी वापर केला जातो. हेच औषध यवतमाळ जिल्ह्यात कपाशीसाठी वापरण्यात आल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे हे औषध कुठून आले, त्याची कोणत्या कृषी केंद्रातून विक्री झाली या प्रकाराची चौकशी केली जाईल, असे ना. सदाभाऊ खोत यांनी सांगितले.
औषध कंपन्या, कृषी केंद्रांवर फौजदारी गुन्हे - सदाभाऊ खोत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2017 6:12 PM