मुंबई : देशातील मेट्रो सिटीमधील बड्या व्यावसायिक आणि उद्योजकांना कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या महाठग अशोक बियाणी (५५) याला जेरबंद करण्यास भांडुप पोलिसांना यश आले आहे. बियाणीचा साथीदार योगेश जिरत (५२) याला दिल्ली पोलिसांनी पकडले असून, त्यांच्या अटकेमुळे फसवणुकीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.भांडुप पश्चिमेकडील टँक रोड परिसरात राहणारे भाजपा कार्यकर्ते जितेंद्र घाडीगावकर यांंच्या आॅनेस्टी नेट सोल्युशन प्रा.लि. कंपनीचे स्टेशन प्लाझामध्ये कार्यालय आहे. दोन वर्षांपूर्वी किरकोळ सामन विकण्यासाठी येणाऱ्या बियाणीने बियाणी ग्रुप कंपनीचे सदस्य असल्याचे सांगून कंपनीमध्ये विदेशी गुंतवणूकदार असल्याचे भासवले़ तुम्ही आमच्या कंपनीत गुंतवणूक केल्यास आर्थिक फायदा होईल़ विदेश गुंतवणूकदाराकडून कर्ज मिळवून देण्याचे आमिष बियाणीने घाडीगावकर यांना दाखवले होते. त्यांनी दिल्ली, नोएडा येथील दोघे साथीदार योगेश जिरत आणि भरत मित्तल यांच्याशी ओळख व बोलणे करून दिले. घाडीगावकर हे जाळ्यात फसल्याचे लक्षात येताच वेळोवेळी कारणे सांगून तब्बल १ कोटी १ लाख रुपये या तिन्ही ठगांनी उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच घाडीगावकर यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये या ठगांविरोधात भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. बियाणीचा शोध घेतेवेळी भांडुप पोलीस दिल्ली पोलिसांंच्या संपर्कात होते. दिल्ली पोलिसांनी बियाणीचा साथीदार जिरतला बनावट चेकप्रकरणी अटक केली. त्यापाठोपाठ बियाणी मुंबईत दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास पथकांनी अंधेरी एमआयडीसी कार्यालयात आलेल्या बियाणीला शनिवारी अटक केली. न्यायालयाने बियाणीला १८ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, याप्रकरणी तिसरा साथीदार भरत मित्तलचा शोध घेत असल्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रताप चव्हाण, एपीआय नितीन गिजे यांनी सांगितले.
उद्योजकांना कोटींचा गंडा घालणाऱ्यांना अटक
By admin | Published: March 16, 2015 3:30 AM