प्रकाश पाटील -कोपार्डे ,, ब्रुसेलोसिस या अत्यंत संसर्गजन्य आजाराचे विषाणू जिल्ह्यातील जनावरांमध्ये आढळल्याने दुग्ध व्यवसायात खळबळ उडाली आहे. हा रोग जनावरांकडून मानवाकडे संक्रमित होऊन यापासून ताप येणे, गर्भपात होणे, अशक्तपणाबरोबर घाम येणे व स्नायूंमध्ये वेदना निर्माण होणे, आदी त्रास होतो. यामुळे दुग्ध व्यवसायावर नवीनच संकट आले आहे. ब्रुसेलोसिस हा अत्यंत संसर्गजन्य झुनोटिक आजार असून तो विषाणूंमुळे होतो. जनावरांच्या गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांत गर्भपात होईपर्यंत इतर कोणतीच लक्षणे न दिसल्यामुळे हा आजार झाल्याचे लवकर लक्षात येत नाही. हा आजार झालेल्या मादी प्राण्यांच्या दुधामध्ये याचे विषाणू आढळतात. आजाराचे संक्रमण झालेल्या वळूच्या वीर्यामध्ये हे विषाणू आढळतात. ज्यामुळे मादीलाही नर असे विषाणू संक्रमित करतात. हा आजार अत्यंत संसर्गजन्य असल्यामुळे संक्रमण झालेल्या जनावरांचे व्यवस्थित न उकळलेले दूध किंवा कमी शिजविलेले मांस खाल्ल्याने किंवा अशा संक्रमित जनावरांच्या स्रावानेदेखील हा आजार पसरतो. या आजाराचा प्रसार गर्भपात झाल्यानंतर एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्यास संपर्काद्वारे होतो. याचबरोबर ब्रुसेलोसिस आजार झालेल्या प्राण्याच्या जखमेद्वारेही हा आजार पसरतो. पशुपालक, जनावरांचे, डॉक्टर, कत्तलखान्यात काम करणारी व्यक्ती या रोगास बळी पडते.या आजाराची लक्षणे सहज लक्षात येत नाहीत. बऱ्याच प्राण्यांमध्ये संक्रमण झाल्यानंतर पहिल्याच गर्भधारणेदरम्यान गर्भपात होतो. त्यानंतर गर्भधारणा व्यवस्थित होते. तरीदेखील संक्रमित जनावरे आयुष्यभर या विषाणूची वाहक राहतात. काही जनावरांच्या हाडांच्या सांध्यामध्ये हे विषाणू आढळतात. येथे सूज येऊन अशा जनावरांच्या हालचालींवर मर्यादा येतात.हा आजार मनुष्यामध्ये संक्रमित झाला की त्यामुळे ताप येणे, गर्भपात, अशक्तपणा, घाम येणे, डोकेदुखी, नैराश्य येणे, स्नायूंच्या व शारीरिक वेदना होतात. मात्र, यावर योग्यवेळी उपचार न झाल्यास ते घातक ठरते. ट्रेटासायक्लीन आणि रिफॅँमपिसिनसारखी प्रतिजैविके व स्ट्रिप्टोमायसिन आणि जेंटामाइसिनसारखी अमाइनोग्लाइकोसाईड ब्रुसेला या विषाणूंविरोधात प्रभावी ठरलीआहेत. हे विषाणू पेशींच्या आत आढळत असल्याने पशुवैद्यकाच्या सल्ल्याने एकापेक्षा जास्त प्रतिजैविकांचा वापर अनेक आठवड्यांपर्यंत करणे गरजेचे आहे. ब्रुसेलोसिस हा रोग अत्यंत संसर्गजन्य व घातक आहे. याची लक्षणे चटकन लक्षात येत नाहीत. यासाठी तो होऊच नये यासाठी जनावरांची व गोठ्यांची नियमित स्वच्छता व लसीकरण ही प्राथमिक काळजी घेणे गरजेचे आहे.डॉ. वर्षा थोरात, पशुवैद्यकीय महाविद्यालय, मुंबईकोल्हापूर जिल्ह्यात हरितक्रांतीनंतर धवलक्रांतीने आर्थिक प्रगती झाली. ताजा पैसा देणारा व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे ग्रामीण भागातील ९५ टक्के लोक वळले आहेत. जिल्ह्यात गाय, म्हैस व मेंढ्या यांचे एकत्रित पशुधन सात लाखांपर्यंत आहे. हे वाचविण्यासाठी शासनानेही या ब्रुसेलोसिस आजाराचे लसीकरण सुरू केले.
दुग्ध व्यवसायावर ब्रुसेलोसिसचे संकट
By admin | Published: August 05, 2014 9:44 PM