रावसाहेब उगले, नाशिक ( Marathi News ): इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाची झळ थेट नाशिकच्या निर्यातक्षम द्राक्ष वाहतुकीला बसली आहे. मागील आठवड्यात हमासने गाझापट्टीवर केलेल्या हल्ल्यात एक जहाज उडविले. त्यामुळे जागतिक जहाज कंपन्यांनी लाल समुद्र आणि सुएझ कालव्यातून होणारी वाहतूक थांबविली आहे. मालवाहतूक आणि विमा खर्चात ३० टक्के वाढ, तसेच युरोपपर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे १५ दिवसांचा विलंब लागणार असल्याने त्याचा परिणाम भारतातून युरोपियन देशांमध्ये होणाऱ्या द्राक्षनिर्यातीवर झाला आहे. परिणामी, नाशिकसह राज्यातील निर्यातदारांनी द्राक्ष खरेदी बंद केली आहे.
काय म्हणतात उत्पादक शेतकरी ?
जानेवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यात नाशिकमधून खऱ्या अर्थाने द्राक्षे निर्यात केली जातात; परंतु निर्यातदारांनाही अतिरिक्त अडीच ते तीन हजार डॉलरची भाडेवाढ सहन करावी लागेल, असे शिरसगावच्या मॅग्नस फार्म फ्रग्चे संचालक लक्ष्मण सावळकर यांनी सांगितले. नाशिकच्या कोऱ्हो येथील सह्याद्री फार्मचे संचालक विलास शिंदे म्हणाले की, युद्धामुळे जहाज वाहतूक कंपन्यांनी वाहतूक थांबविली आहे. जे कंटेनर या मार्गावर आहेत त्यांना पुढे पाठवायचे की नाही, याबाबत चर्चा सुरू आहे. पर्यायी मार्गाने कंटेनर पाठवायचे ठरल्यास वेळ आणि पैसा लागणार आहे.
पांढरं सोनं : पावसात सापडलं अन् भावात घसरलं
विवेक चांदूरकर, खामगाव (जि. बुलढाणा) : अवकाळीच्या तडाख्यातून एकेक झाडं वाचवलं. लागवडपासून ते वेचणीपर्यंत निंदण, फवारणीवर हजारो रुपयांचा खर्च केला. मात्र हाती येणारं पीक पावसात सापडलं अन् पांढरं सोनं भावात घसरलं. यंदा १२ हजार रुपये प्रतिक्विंटल भावाची अपेक्षा होती. मात्र, ४,५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कापूस विकावा लागत आहे, अशी व्यथा शेतकरी मांडत आहेत.
दर्जा घसरल्याचे कारण...
अवकाळी पाऊस, बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कापसाचा दर्जा घसरला आहे. कापसाची बोंडे खुलली नसून कवळीमुळे कापसाचे मोठे नुकसान झाले आहे. गत पाच वर्षांतील कापसाचा हा नीचांकी दर आहे. सन २०२१-२२ मध्ये कापसाचे दर १२ ते १३ हजार रुपयांवर पोहोचले हाेते. त्यामुळे यंदाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापसाची पेरणी केली होती.
५०० रुपयांचा चढ-उतार, हळद उत्पादक झाले हैराण
रमेश वाबळे | हिंगोली : येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डात हळदीच्या दरात दिवसाआड चारशे ते पाचशेंचा चढ-उतार होत आहे. त्यामुळे हळद विक्रीसाठी आणावी की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये द्विधावस्था आहे. तर व्यापारीदेखील खरेदी करताना हात आखडता घेत असल्याचे चित्र आहे.
आवक वाढली अन् भाव घसरले...
मार्केट यार्डात बुधवारी ६०० क्विंटल हळदीची आवक झाली होती. या दिवशी सरासरी १२ हजार ५० रुपये भाव मिळाला. जवळपास दोनशे ते तीनशे रुपयांनी भाव वधारल्यामुळे शुक्रवारी आवक वाढली. बाजार समितीने दिलेल्या माहितीनुसार २ हजार ५०० क्विंटल हळद विक्रीसाठी आली होती. परंतु आवक वाढताच भावात सरासरी ४५० रुपयांची घसरण झाली.
सोयाबीनमुळेही पदरी निराशा
मोंढ्यात २१ डिसेंबर रोजी सोयाबीनला सरासरी ४ हजार ७०० रुपये भाव मिळाला होता. तर दुसऱ्या दिवशी भाव घसरून ४ हजार ५७५ रुपयांवर आले. यंदा उत्पादनात प्रचंड घट झाल्याने किमान ६ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र, त्यांची घोर निराशा झाली आहे.