मुंबई : महाविकास आघाडीतील खातेवाटपाचा तिढा सुटताना दिसत नसून काल रात्री झालेल्या 4 तासांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचे समजते.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्रीमंडळाचे आज खातेवाटप जाहीर होणार होते. मात्र, काँग्रेसला कृषीखाते हवे आहे. कारण अशोक चव्हाण आणि बाळासाहोब थोरात यांना मोठी खाती द्यायची आहेत. यावेळी चर्चेत अजित पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा विषय काढला. यावर अशोक चव्हाण यांनी आक्षेप घेत ते मंत्रीमंडळात नाहीत. मग त्यांचा इथे संबंध काय असा प्रश्न विचारला. यानंतर अजित पवारांनीही आधी तुमचा नेता ठरवा, मग बोलू, असे म्हटल्याने चव्हाण तेथून निघून गेल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे.
यावर पुरातन बंगल्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की, जे पालकमंत्री होणार आहेत त्यांची नावे उद्या जाहीर केली जातील. खातेवाटपाचा निर्णय झाला. काही खात्यांवर वेगवेगळे मतमतांतर आहे. यामुळे असे ठरले की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यामध्ये निर्णय घेतील, असे अजित पवार यांनी पत्रकारांना सांगितले. मतमतांतरावरून बैठकीत खडाजंगी झाल्याचे संकेत त्यांनी दिले.
तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनीही मुख्यमंत्र्यांना खातेबदलाचा प्रस्ताव दिला आहे. ते यावर निर्णय घेतील, असे सांगितले. या बैठकीला मुख्यमंत्री उपस्थित नव्हते, पण त्यांच्याशी बैठकीतील चर्चा फोनवर केल्याचे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच खातेबदलावर मुख्यमंत्रीच निर्णय़ घेतील, असे सांगितले. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी आजच खातेवाटप होईल, असे स्पष्ट केले आहे.