लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे/सांगली : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी घोषणा झालेल्या डॉ. तारा भवाळकर या लोकसाहित्याचा मूलगामी शोध घेणाऱ्या व लोकसाहित्याची मूलगामी समीक्षा करणाऱ्या मीमांसक म्हणून प्रसिद्ध आहेत. १ एप्रिल १९३९ राेजी त्यांचा जन्म झाला. साहित्य, लोकसाहित्य, लोकसंस्कृती, नाटक यांच्या सखोल अभ्यासावर त्यांचा वैचारिक पिंड उभा राहिला आहे.
डॉ. भवाळकर यांची लोकसाहित्य ते नाट्यशास्त्रापर्यंतचा संशोधक संदर्भ कोश, मार्क्सवाद ते गांधीवाद यांच्या अभ्यासक, आधुनिक स्त्रीवादी चळवळीच्या साक्षेपी समीक्षक, सामाजिक चळवळीच्या नामवंत अभ्यासक, प्राध्यापिका, कसदार वक्त्या, अशी विविधांगी ओळख आहे. त्या १९५८ ते १९७० या काळात माध्यमिक शिक्षिका होत्या. १९७० ते १९९९ या काळात सांगलीच्या श्रीमती चंपाबेन वालचंद शहा महाविद्यालयात प्राध्यापक होत्या. ‘मराठी पौराणिक नाटकाची जडणघडण : प्रारंभ ते १९२०’ या त्यांच्या पीएच.डी. प्रबंधाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्वोत्कृष्ट प्रबंध पुरस्काराने गौरविले आहे. अमेरिका व इंग्लंड येथील विद्यापीठांतही त्यांनी चर्चासत्रात भूमिका मांडली. मराठी विश्वकोशाच्या लोकसाहित्य विभागाच्या त्या अतिथी संपादकही होत्या. दिवंगत डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या बरोबर त्यांनी लिहिलेले ‘महामाया’ पुस्तकही फार महत्त्वाचे समजले जाते.
नाट्यप्रकारांची जडणघडण
- डॉ. भवाळकर यांनी पौराणिक नाटक, लोकनाट्य, दशावतार, तंजावरची नाटके, यक्षगान, कथकली अशा नाट्यप्रकारांची जडणघडण शोधली.
- त्यांचे समग्र लेखन वस्तुनिष्ठ, यथार्थ व चिकित्सक दृष्टी आणि सैद्धांतिक अभ्यासाचा वस्तुपाठच केला आहे. त्यांनी आपल्या लोकसाहित्यात आणि लोकपरंपरेत निसर्गाची पूजा केलेली दिसते.
विविध पुरस्कार प्राप्त
महाराष्ट्र राज्याचा उत्कृष्ट ग्रंथ निर्मिती पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा वि. मा. गोखले पुरस्कार, मसाप गौरव पुरस्कार, पुणे नगर वाचनालयाचा श्री. ना. बनहट्टी पुरस्कार, मुंबई विद्यापीठाचा डॉ. अ. ना. प्रियोळकर पुरस्कार, सह्याद्री दूरदर्शन वाहिनीचा रत्न शारदा पुरस्कार, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचा विशेष सन्मान पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला.