औरंगाबाद - मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. कुणाचा दसरा मेळावा सर्रस ठरणार असा प्रश्न विचारला जात आहे. एकीकडे दरवर्षीप्रमाणे शिवाजी पार्क येथे उद्धव ठाकरे शिवसेनेचा दसरा मेळावा घेत आहेत तर यंदा पहिल्यांदाच आमचीच खरी शिवसेना असा दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दसरा मेळावा घेत आहेत. त्यामुळे शिंदे-ठाकरे गटाकडून जास्तीत जास्त गर्दी जमवण्याची तयारी सुरू आहे. मात्र या दसरा मेळाव्यात विचार नाही तर नाटकं पाहायला मिळतील अशी खोचक टीका मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे.
प्रकाश महाजन म्हणाले की, आता पहिल्यांदा कुणाकडे डोकी जास्त आहेत त्यावरून खरी सेना कुणाची हे ठरणार. यंदाच्या दसरा मेळाव्यात विचार ऐकायला मिळणार नाही. एकमेकांचे वस्त्रहरण करणार आहेत. सोनं लुटण्याऐवजी अंगावरच्या चिंध्या गोळा कराव्या लागतील. मेळावे यशस्वी होण्याऐवजी यामागे असणारी जी शक्ती आहे त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शिवतीर्थावरील मेळावा यशस्वी झाला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिष्ठा जाणार आहे. यशस्वी झाला तर राहिलेल्या शिवसैनिकांचे मनोध्यैर्य वाढणार आहे त्याचसोबत बीकेसीतील मेळावा यशस्वी झाला नाही तर भाजपाची प्रतिष्ठा पणाला लागेल. त्यामुळे मेळावे यशस्वी करण्याची गरज संयोजक, आयोजकांपेक्षा इतरांना जास्त आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच दसरा मेळाव्यावरून महाराष्ट्राचं पुढचं राजकारण ठरणार आहे. मुंबई कुणाच्या हातात राहील यासाठी उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे यांच्या मागे असणाऱ्या शक्ती कामाला लागल्या आहेत. बाळासाहेबांवर निष्ठा आहे की नाही? बाळासाहेबांवर निष्ठा आहे हे दाखवण्यासाठी शिवसैनिक शिवतीर्थावर जमा होतील. मात्र शिंदे गटाचं उलटं आहे. सत्तेतून मिळणाऱ्या पैशाचा वापर करत बसेस भरून लोकं आणली जाणार आहेत. उद्या बीकेसीत गर्दी जमली नाही तर लोकं त्यांच्यावर संशय घेतील. जे शिंदेंसोबत बाहेर पडलेत त्यांना हा मेळावा यशस्वी करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील. ज्यांच्या भरवशावर शिंदे बाहेर पडलेत त्यांच्या समोरही हा मेळावा यशस्वी करण्याचं मोठं आव्हान आहे असंही मनसे नेते प्रकाश महाजन यांनी सांगितले.