BJP vs Mahavikas Aghadi: सुमारे वर्षभरापूर्वीच गुजरातेत गेलेल्या एअरबस प्रकल्पावरून टीका करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या जनतेशी केलेले पाप लपविण्याचा प्रकार आहे, अशी टीका महाराष्ट्र भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केल्यावर ८ सप्टेंबर २०२१ रोजी मे. एअर बस आणि स्पेस एसए स्पेन यांच्यातील कराराला मंत्रिमंडळ सुरक्षा समितीने मान्यता दिली आणि लगेच २४ सप्टेंबर २०२१ रोजी संरक्षण मंत्रालयासोबत सामंजस्य करार करण्यात आला, अशी माहितीही त्यांनी दिली.
"या प्रकल्पाबाबतच्या गोष्टी मागच्या वर्षीच घडल्या आहेत. असे असताना सुद्धा हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी एकही पत्र तत्कालिन महाविकास आघाडी सरकारने पाठविले नाही वा कोणता पाठपुरावा केला नाही. वस्तुस्थिती माहिती असताना निव्वळ दिशाभूल करण्याचे राजकारण आता तरी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करु नये. मुद्यांवर बोलायचे असल्यास टाटा एअरबसला लिहिलेले एकतरी पत्र त्यांनी जाहीर करावे", असे आव्हान केशव उपाध्ये यांनी दिले.
सुमारे दीड लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला वेदांता-फॉक्सकॉन हा मेगा प्रकल्प महाराष्ट्रातून आधीच गुजरातमध्ये गेला. त्यानंतर आता टाटा एअरबस हा प्रकल्प आता, शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात गुजरातमध्ये गेला, असा दावा महाविकास आघाडीने केला. तब्बल २२ हजार कोटींच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प होता. मात्र तो प्रकल्प गुजरातमध्ये गेला, यासाठी महाविकास आघाडीने भाजपाला दोष दिला. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महिनाभरापूर्वी म्हटलं होतं की, एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात येणार आहे. टाटाच्या कोलॅब्रेशनसोबत हा प्रकल्प येणार आहे. मात्र तरी देखील हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारच्या धोरणावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असे महाविकास आघाडीकडून आरोप करण्यात आले. त्यावर उपाध्ये यांनी उत्तर दिले.
हा प्रकल्प गुजरातमधील बडोद्यात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन ३० ऑक्टोबर रोजी होणार आहे.