- अतुल कुलकर्णी
गेल्या काही दिवसांपासून वर्तमानपत्रातल्या बातम्या आणि तर्कवितर्क पाहून बाबूराव वैतागले होते. त्यांच्या समोर एकच प्रश्न होता तो म्हणजे, टीपू सुलतान योद्धा होता की नव्हता..? आणि होता तर आता ‘हे’ लोक त्याच्याविरुद्ध का बोलत आहेत... काही केल्या बाबूरावांचं डोकं चालेना. त्यांनी हा विषय थेट पुरातत्त्व विभागाकडं न्यायचं ठरवलं. तेवढ्यात बाबूरावांच्या सौ म्हणाल्या, तुम्ही थेट न जाता आधी त्या पुरातत्त्ववाल्यांना पत्र लिहा. तुम्हाला काय म्हणायचं आहे सगळं त्यात मांडा, नंतर भेटायला जा... बाबूरावांना सौंचा सल्ला पटला. त्यांनी तात्काळ पत्र लिहायला घेतलं. ते पत्र असं -माननीय पुरातत्त्व विभागप्रमुख,तुमचा आणि सध्या देशात असणाऱ्या जुन्या-पुराण्या वस्तूंचा, बिल्डिंगचा, माणसांचा काही संबंध आहे की नाही..? असला तर तुम्हाला काही लिहिण्यात अर्थ आहे, नाहीतर कशाला वेळ वाया घालवू...? सध्या आमच्याकडं टीपू सुलतानवरून चर्चा, मोर्चा, गदारोळ सगळं काही चालू आहे. मुंबई भाजपाचे नेते, कार्यकर्ते टीपूचे नाव काढलं की अंगावर येतात. मुंबईत एका मैदानाला टीपू सुलतानचं नाव दिलं आहे. तशी मुंबई सात बेटांची होती म्हणे. आता हे मैदान नेमक्या कोणत्या बेटावरचं होतं? की भराव टाकून बनवलं होतं...? त्यामुळे त्या मैदानाचा सातबारा तुमच्या पुरातत्त्व विभागात कोणाच्या नावाने आहे हे कळू शकेल का? आता टीपूचं नाव का दिलं असं विचारले की, आम्हाला लगेच काही जण देशद्रोही वगैरे म्हणतात. असं कोणाचं नाव घेतलं की, माणूस देशभक्त किंवा देशद्रोही ठरतो का? पुरातत्त्व विभागात याचे काही दाखले आहेत का...? बघा काही सापडतात का ते...? आमच्या मनात आणखी काही प्रश्न आहेत. ज्या मुंबईत टीपूच्या नावावरून वाद सुरू आहे त्याच मुंबईच्या अंधेरी भागात २००१ साली एका रस्त्याला टीपू सुलतानचे नाव दिलं म्हणे... आणि त्यावेळी भाजपचे सगळे नेते हजर होते.. एवढंच कशाला, २०१३ साली गोवंडीत एका रस्त्याला टीपूचं नाव दिलं आणि तो प्रस्ताव भाजपच्या नगरसेवकानेच आणला होता म्हणे... तिकडे अकोल्यातसुद्धा महापालिकेत स्थायी सभागृहाला टीपूचे नाव दिलंय... त्यासाठीच्या प्रस्तावाचे सूचक भाजपचेच नगरसेवक होते म्हणे... हे सगळं कुठं तपासून मिळेल... याची काही कागदपत्रे जुनी-पुराणी झाली म्हणून पुरातत्त्व विभागात पाठवली जातात का...? आमच्या घरी जुने कागद, पुस्तकं, एखादी बाटली सापडली तर लगेच आमच्या सौ. द्या पाठवून पुरातत्त्व विभागात असं म्हणतात.... म्हणून आपलं विचारलं... ते जाऊ द्या... २०१२ साली यदुरप्पा यांनी टीपू सुलतानच्या कबरीला भेट दिली होती आणि तिथल्या वहीत हा ग्रेट वॉरीयर होता, असं लिहून ठेवलंय म्हणे... ते तर काहीच नाही... आपले राष्ट्रपती २०१७ मध्ये कर्नाटक विधानसभेत आले होते. त्यावेळी त्यांनी टीपू सुलतानचं वर्णन ‘देशासाठी प्राणाची आहुती देणारा योद्धा,’ असं केलं होतं. आता हे सगळं जुनं-पुराणं कोण तपासून देणार सांगा बरं...? जाता जाता आणखी एक... आमच्या मुंबईत एक जांबोरी मैदान आहे. तिथं म्हणे महात्मा गांधीजींच्या नावाची पाटी होती... आणि ती शिवसेनेने काढली, असं भाजपवाले म्हणत आहेत... त्यामुळेसुद्धा आमच्या मनात काही प्रश्न आले आहेत... आमच्या पत्रात दिलेले सगळे दाखले भाजपवाले टीपू सुलतानवर प्रेम करणारे होते, असं सांगणारे आहेत. मात्र, तेच आता टीपूवर टीका आणि गांधीजींवर प्रेम करत आहेत... ही काय भानगड आहे...? याचे तपशील तुमच्या पुराण विभागात आहेत का? जाता जाता एकच शेवटचं सांगा, गांधीजी नेमके कोणाचे होते...? की फक्त सरकारी भिंतीवर लावण्यापुरतेच होते...? सगळं जग गांधीजींच्या विचारावर चालतोय असं म्हणतं... आपण नेमकं कोणाच्या विचारावर चालतोय... आपला आणि गांधीजींचा काही संबंध आहे का...? तुमच्या पुराण खात्यात त्याच्या काही नोंदी आहेत का..? बघा सापडतात का काही...?तुमचाच,बाबूराव