पुणे - संजय राऊतांवर टीका करणं ही अनेकांची फॅशन झालीय. काहीही झाले तरी संजय राऊत असं भाजपाचं होतं, भाजपाची ही लाईन शिंदे गटाच्या बोलघेवड्यांनी चालवली. प्रबोधनकारांच्या जयंतीदिवशी वंचित बहुजन आघाडीसोबत आमची युती झाली. त्यानंतर अवघ्या २ दिवसांत संजय राऊत कोण असं विधान वंचितकडून आलं ते फार वाईट होते. संजय राऊत हे आमच्या पक्षाचे चिलखत, निष्ठेचे दुसरं नाव म्हणजे संजय राऊत असं सांगत सुषमा अंधारे यांनी प्रकाश आंबेडकरांवर पलटवार केला आहे.
सुषमा अंधारे म्हणाल्या की, संजय राऊतांनी जे सोसलं, भोगलं आणि जे पक्षासाठी योगदान दिले ते क्वचितच इतर पक्षात बघायला मिळते. जर शिंदे गट किंवा फुटलेल्या राष्ट्रवादीकडे एकतरी संजय राऊत असता तर त्यांनी जेल भोगायची तयारी ठेवली असती. पक्षासाठी जेलमध्ये जाणारे संजय राऊत आहेत. त्यांच्याबद्दल बोलल्याने आम्ही किती दुखावलो गेलो याचा विचार कुणी केला का?, जर युती आमच्याशी झाली होती. तर वंचित बहुजन आघाडीची मुंबईत सभा झाली तेव्हा उद्धव ठाकरेंना निमंत्रण का दिले नाही?. जेव्हा जेव्हा इंडिया आघाडीच्या बैठकीचे निमंत्रण त्यांना दिले तेव्हा त्याला प्रतिसाद दिला नाही. निमंत्रणानंतर तिसऱ्या चौथ्या फळीतील नेत्यांना बैठकीत पाठवले असं अंधारे यांनी म्हटलं.
तसेच वारंवार शिवसेनेने प्रस्ताव पाठवला, ४ ऐवजी ५ जागांचा प्रस्ताव गेला. जे जे समोरून मांडण्यात आले त्याला लॉजिकली काय उत्तरे द्यायची हे कळलं नाही. मनुवादी विचारांविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेचे पाईक म्हणून प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावं ही अपेक्षा आहे असं सुषमा अंधारे यांनी सांगितले.
दरम्यान, नरेंद्र मोदींनीही ठाण्यात अर्ज भरावा, तिथे राजन विचारे जिंकणारच. ठाण्यात गद्दारीला थारा नाही. निष्ठेचा इतिहास आहे. ठाण्यात आतापर्यंत इतक्या केसेस टाकल्या तरी शिवसैनिक मागे हटला नाही. कल्याणमध्ये माझे नाव चर्चेत आले त्यामुळे श्रीकांत शिंदे यांचे नाव अद्याप जाहीर केले नाही. जो कुणी उमेदवार असेल त्याच्याविरोधात ताकदीने आम्ही लढू. ही लढाई जनशक्ती आणि धनशक्ती आहे. मुंबईत आमची ताकद आहे. त्यामुळे प्रत्येक जागेवर आम्ही दावा करतो असंही सुषमा अंधारे यांनी म्हटलं.