अकोला : मंत्रोपचाराने पिकांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होत असल्याने कृषी विद्यापीठात हा प्रयोग घेण्यात येत असल्याचे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी शुक्रवारी युवा महोत्सवात केले. त्यांच्या वक्तव्यावर अंधश्रध्दा निर्मूलन समितीने आक्षेप घेतला असून, शनिवारी समितीच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरूंची भेट घेऊन यामागील शास्त्रीय कारण मागितले.कृषी विद्यापीठातंर्गत आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाचे उदघाटन कुलगुरू डॉ. भाले यांच्या हस्ते झाले. यावेळी संगीताची जादू संर्व विश्वावर आहे. अमेरिकेसारख्या देशात शास्त्रीय संगीत गुंजताना दिसत आहे आणि जनावरांच्या दूध उत्पादनात संगीतामुळे वाढ होत असल्याचे ते म्हणाले. मंत्रोच्चाराचा पिकांच्या वाढीवर सकारात्मक परिणाम होतो, मंत्रांच्चारामुळे मानसिक थकवा दूर होतो, तबला व बासरीची लय या साऱ्यात महत्त्वाची आहे, असे विचार डॉ. विलास भाले यांनी मांडले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी कुलगुरू डॉ. विलास भाले यांची भेट घेतली आणि त्यांच्या या विधानांना आक्षेप घेतला.त्यावर, माझा पिंड संशोधकाचा असल्यामुळे जे प्रयोगाअंती सिद्ध झालेले असते, तेच मी स्वीकारतो, मंत्रोच्चाराने पिकांवर परिणाम होत नसल्याचे माझे मत आहे, असे कुलगरूंनी आपणास सांगितल्याचे अंनिसचे जिल्हा संघटक पुरुषोत्तम आवारे म्हणाले.मंत्रोच्चाराने पीक उत्पादनात होणारी वाढ हा कृषी विद्यापीठाला प्रकल्प मिळाला आहे. यासंदर्भात मी भाषणातून बोललो, शास्त्रज्ञ मात्र वैज्ञानिक शास्त्राचे आधारेच कमी खर्चात भरपूर उत्पादनासाठी संशोधनकरीत आहेत.- डॉ. विलास भाले, कुलगुरू
म्हणे मंत्रोच्चाराने वाढतात पिके!; कुलगुरूंच्या वक्तव्यावर अंनिसचा आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2018 6:18 AM