प्रधानमंत्री फसल बीमा योजनेंतर्गत राज्यात पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेंतर्गत २०१८-१९ मध्ये आंबिया बहारासाठी लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील द्राक्ष, संत्रा, मोसंबी, केळी, आंबा, काजू, पेरू व लिंबू या फळ पिकांसाठी निवडक जिल्ह्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली.
कमी/जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सापेक्ष आर्द्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीसाठी शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि आर्थिक साहाय्य देणे, फळपीक नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकºयांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे या उद्देशाने ही योजना लागू करण्याचा निर्णय शासनाने घेतला.
न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लि.अंतर्गत वाशिम, वर्धा, जालना, पुणे, रत्नागिरी, लातूर व अकोला, तर अॅग्रिकल्चर इन्शुरन्सअंतर्गत ठाणे, कोल्हापूर, परभणी, यवतमाळ, नाशिक हिंगोली, रायगड, धुळे, नागपूर, जळगाव, सोलापूर, सिंधुदुर्ग, सातारा, उस्मानाबाद, बुलडाणा, औरंगाबाद, अहमदनगर, अमरावती, पालघर, सांगली, नांदेड व बीड जिल्ह्याचा समावेश आहे.