पुणे : अतिवृष्टीने बाधित पिकांची विमा नुकसानभरपाई शेतकऱ्यांना महिनाभरात मिळणार आहे. राज्य सरकारने ९७३ कोटी रुपयांचा पहिला हप्ता जमा केल्यानंतर आता केंद्र सरकारही लवकरच ९०० कोटी रुपये विमा कंपन्यांकडे जमा करणार असून, त्यामुळे कंपन्यांना आता पैसे अदा करावेच लागतील. राज्य सरकारने पैसे जमा केल्यानंतर नियमाप्रमाणे विमा कंपन्यांनी केंद्राकडे त्यांच्या पहिल्या हप्त्याची मागणी करायला हवी होती. ती केलीच गेली नाही. राज्य कृषी खात्याच्या पाठपुराव्यानंतर आता विमा कंपन्यांनी केंद्र सरकारकडे त्यांच्या पहिल्या हप्त्याची मागणी केली आहे.राज्यात एकूण सहा विमा कंपन्या केंद्र सरकारने दिल्या आहेत. जुलै व नंतरच्या अतिवृष्टीत पिके बाधित झाल्याच्या राज्यभरात एकूण ३३ लाख ८३ हजार पूर्वसूचना विमा कंपन्यांकडे दाखल झाल्या आहेत. राज्य सरकारने कंपन्यांकडे विम्याच्या पहिल्या हप्त्याचे ९७३ कोटी रुपये जमा करून १५ दिवसांपेक्षा जास्त काळ झाला. दरम्यानच्या काळात विमा कंपन्यांनी केंद्र सरकारकडे त्यांच्या पहिल्या हप्त्याची मागणी करणे आवश्यक होते. राज्याच्या ९७३ कोटी रुपयांवर व्याज मिळत असल्याने कंपन्यांकडून ही मागणी केली जात नव्हती. मात्र, कृषी खात्याच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता सर्व कंपन्यांनी केंद्राकडे मागणी केली आहे.त्यामुळे साधारण महिनाभरात त्यातही काहीजणांना दिवाळीपूर्वीच विम्याची नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे. दाखल झालेल्या ३३ लाख पूर्वसूचनांपैकी २० लाखपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे कृषी खात्याकडून युद्धस्तरावर करण्यात येत आहेत. केंद्र सरकारकडे सर्व कंपन्यांनी बिले (एकूण मागणी) जमा केली असून, रकमेची मागणी केली आहे. ते पैसे विनाविलंब मिळतात. पंचनामे होऊन ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची रक्कम निश्चित झालेली आहे, त्यांना पैसे मिळण्यात आता काही अडचण नाही.- विनयकुमार आवटी, विभाग प्रमुख, सांख्यिकी, कृषी विभाग
महिनाभरात पीक विम्याची नुकसानभरपाई मिळणार; राज्यात ३४ लाख बाधित शेतकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 9:10 AM