मुंबई : चलनातून ५०० व १०००च्या नोटा रद्द केल्याच्या तसेच स्थानिय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात ठिकठिकाणी तपासणी मोहीम सुरू आहे. याच मोहिमेदरम्यान कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत.विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि अकोला जिल्ह्यात गुरुवारी एकूण २ कोटी २३ लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडमध्ये एक कोटी ७७ लाख रुपये ताब्यात घेण्यात आले असून ही रक्कम माहूर आणि नांदेड येथील बँकांची असल्याचे पुढे आले आहे. माहूरहून नांदेडकडे जाणाऱ्या एका वाहनात एक कोटी २४ लाख रुपये आढळले. त्यानंतर अन्य एका वाहनाची तपासणी करताना ५३ लाख रुपये सापडले. चंद्रपूरच्या सिंदेवाही येथे निवडणूक पथकाने दुपारी एका गाडीतून ३० लाखांची रोकड जप्त केली. यात ५०० व १००० च्या नोटांचा समावेश असून पोलिसांनी दोघांना अटक केली. उशिरापर्यंत रोकड नेमकी कुणाची, हे स्पष्ट झाले नव्हते.वर्ध्यात नाकेबंदी दरम्यान आर्वी पोलिसांनी एका कारमधून ५०० व १००० च्या पाच लाखांच्या नोटा जप्त केल्या.ही पाच लाखांची रोकड असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. तर, अकोल्याच्या आकोट येथे नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी एका व्यक्तीकडून ४ लाख ३० हजार रुपयांची रक्कम जप्त केली; परंतु याप्रकरणी कोणताही गुन्हा आकोट शहर पोलिसांत दाखल नाही. गोंदिया जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वाहन तपासणीदरम्यान रोकड जप्त करण्यात आली.सालेकसा आणि अर्जुनी मोरगाव तालुक्यात केलेल्या या कारवाईत सात लाख रुपये जप्त करण्यात आले.अर्जुनीकडून गडचिरोलीकडे अॅम्बेसेडर कारने येणाऱ्या गडचिरोली येथील जीवनकुमार बाट यांच्याकडे २ लाख ५ हजार रुपये आढळून आले. या नोटा गोंदिया कोषागार कार्यालयात जमा करण्यात आल्या. (लोकमत न्जूज नेटवर्क)
ठिकठिकाणी कोट्यवधी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2016 5:34 AM