मुंबई : दिवाळीमध्ये मिठाई, लाडू, फरसाण आणि अन्य पदार्थांसाठी चणाडाळीची मागणी वाढते. चणाडाळीचे उत्पादन राज्यात होत नसल्याने परदेशातून आयात केली जाते. गेल्या वर्षी रशियाहून आलेल्या चणाडाळीचा निकृष्ट दर्जाचा माल मुंबई, ठाणे परिसरात आला होता. त्यानुसार, अन्न व औषध प्रशासनाला कळताच २२ आॅक्टोबरला ४ ठिकाणी धाडी टाकून तब्बल पावणेतीन कोटी रुपये किमतीची निकृष्ट दर्जाची रशियन चणाडाळ जप्त करण्यात आली आहे. गेल्या वर्षभरापासून न्हावा शेवा बंदरावर पडून असलेली रशियन चणाडाळ दिल्लीच्या एका कंपनीने मुंबई आणि ठाणे परिसरात विक्रीसाठी आणल्याची माहिती एफडीएला मिळाली होती. त्यानंतर एफडीएने टाकलेल्या धाडीत १९३.७ टन वजनाच्या डाळीचा साठा मे.ए.ए. कोल्डस्टोरेज अॅण्ड आइस फॅक्टरी प्रा. लि., डी- ३९५ एमआयडीसी, तुर्भे येथे जप्त केला. या डाळीची किंमत १ कोटी ५४ लाख ९९ हजार ८४० रुपये इतकी आहे. या साठ्यात असलेल्या डाळीला कीड लागली होती. सडलेल्या आणि निकृष्ट दर्जाच्या डाळीचे पॅकिंग केले होते. पिशव्यांवर कोड नंबर, लॉट नंबर, मुदतबाह्य दिनांक, वजन याचे लेबल लावलेले नव्हते. पॅकिंगसाठी दिल्लीचा क्रमांक लिहिलेला होता. या ठिकाणी एफडीएच्या अधिकाऱ्यांनी अधिक चौकशी केल्यावर मे. गाला फुड्स प्रा. लि.द्वारा ओम वेअर हाऊस सी - ३४ एमआयडीसी पावणे, नवी मुंबई येथून ४४.६ टन वजनाची डाळ जप्त करण्यात आली. या डाळीची किंमत ४८ लाख २१ हजार ९८४ रुपये इतकी आहे. तर, दुसऱ्या ठिकाणी ७ लाख ७९ हजार ८०० किमतीची ७.८ टन वजनाची डाळ जप्त करण्यात आली आहे. शिरवणे परिसरातून ५१.९९ टन डाळ जप्त करण्यात आली आहे. या डाळीची किंंमत ६७ लाख ५९ हजार ७४० रुपये इतकी आहे. (प्रतिनिधी)कुठून आली निकृष्ट दर्जाची चणाडाळ? गेल्या वर्षी नोव्हेंबर २०१५ मध्ये न्हावा शेवा बंदरावर रशियन काबुली चण्याची डाळ इंदौर येथील मे. जवाहरलाल अॅण्ड सन्सने आयात केली होती. हा साठा आक्षेपार्ह स्थितीत सुमारे वर्षभर बंदरावर पडून होता. वर्षभरानंतर दिवाळी जवळ आल्यावर दिल्लीतील मे. रामस्वरूप रामनिवास अॅण्ड सन्स यांनी बाजारात विक्रीसाठी आणली.सणासुदीच्या काळात पदार्थांची मागणी वाढत असल्यामुळे भेसळयुक्त अथवा निकृष्ट दर्जाचा माल बाजारात आणला जातो. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असल्यामुळे चण्याची डाळ, खवा, मावा यांची मागणी वाढते. ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम राज्यभर राबविली आहे. यात प्रत्येक ठिकाणी साहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एका पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. ही पथके विविध भागांत तपासणी करत आहेत. ग्राहकांनी माल खरेदी करताना लक्ष ठेवले पाहिजे. कमी किमतीत माल मिळत असल्यास त्या पदार्थाची मुदत आणि दर्जा तपासला पाहिजे. - डॉ. हर्षदीप कांबळे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
निकृष्ट दर्जाची पावणेतीन कोटींची डाळ जप्त
By admin | Published: October 25, 2016 2:34 AM