ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 22 - गुंतवूणकदारांना वार्षिक २४ टक्के व्याजाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी हॉउस आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीचे प्रमुख संचालक विनोद पाटील यांसह दहा संचालकांवर शनिवारी (दि़२०) गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणूक, एमआयडीसी कायदा ३/४ सिक्युरीटीज कॉन्ट्रॅक्टर कायदा कलम १९५६ चे कलम २३ व कंपनी कायदा २०१३ चे कलम ३६७, ३७४, ७५, ४४७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या कंपनीच्या संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलीस आयुक्त एस़जगन्नाथन यांनी दिले होते़गंगापूर पोलीस ठाण्यात गणेश गुरुनाथ देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कंपनीचे संचालक संशयित विनोद बाळू पाटील (रा.नवीन नाशिक), सुशांत रमेश कोेठुळे (रा. तपोवन), भगवंत कोठुळे (रा. तपोवन), महेश सुधाकर नेरकर (रा. नवीन नाशिक), अनिल निवृत्ती कोठुळे (नवीन नाशिक), रवींद्र पुंडलिक दळवी (रा. पंचवटी), दर्शन विजय शिरसाठ (रा. नाशिकरोड), सतीश सेषराव कामे (रा. नवीन नाशिक), विजय लक्ष्मण खूनकर व सुरेखा भगवंत कोठुळे (रा. जेजूरकर मळा, तपोवन) यांनी गुंतवणुकीवर २४ टक्के व्याजाचे आमिष दाखवून तीन लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले आहे़ हाऊस आॅफ इन्व्हेस्टमेंटमध्ये ११ लाख रुपये गुंतवल्यानंतर सात महिने होऊनही संचालकांनी परतावा न देता फसवणूक केल्याची तक्रार गिरणारे येथील शेतकरी गणेश रवींद्र काटे याने मे पोलीस आयुक्तांकडे केली होती़ त्यावर कारवाई झालेली नव्हती तसेच कंपनीच्या संचालकांकडून पैसे परत देण्याचे आश्वासन दिले जात होते़ दरम्यान, पोलीस प्रशासनाने संचालकांना वेळ देऊनही त्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यास टाळाटाळ करण्याचे धोरण सुरूच ठेवल्याने आयुक्त एस. जगन्नाथन यांनी दिलेल्या आदेशनुसार हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालकांविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने शनिवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला़हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंट प्रा. लिमिटेड या कंपनीच्या संचालकांनी वार्षिक २४ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवत तब्बल ३०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा केल्याचा आरोप गुंतवणूकदारांनी केला आहे. कंपनीचे प्रमुख्य संचालक विनोद पाटीलने सुमारे चार वर्षांपूर्वी हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंट प्रा. लिमिटेडची स्थापना केली होती. या कंपनीचे सुमारे ३० एजंट असून, त्यांच्यामार्फत तीन हजार २० गुंतवणूकदारांकडून ५० हजारांपासून एक कोटी रुपयांपर्यंतच्या रकमेची गुंतवणूक केली आहे़ संचालक विनोद पाटील याने गुंतवणूकदारांची रक्कम पोर्टफोलिओ मॅनेजमेंट अॅण्ड सर्व्हिसेस, विनोद बुलियन्स दुबई, हाउस आॅफ बुलियन्स, हाउस आॅफ इन्व्हेस्टमेंट, हाउस आॅफ बिल्डकॉन, हाउस आॅफ अॅग्रो कम्युनिटी यांसह इतर कंपन्यांच्या माध्यमातून शेअर मार्केट तसेच बांधकाम व्यवसायात गुंतवले. पाच ते सहा महिन्यांपूर्वी पाटील यांनी व्याजाची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केल्याने गुंतवणूकदारांनी मुद्दल परत मागण्यास सुरुवात केली होती.