मुंबई : देशात नोटांची चणचण भासत असल्याने, रविवारीही बँका सुरू ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यामुळे जिवाची मुंबई करण्याऐवजी, निम्नमध्यम वर्गीय मुंबईकर सकाळपासूनच बँकांबाहेर रांगा लावून होते. मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीयांना मॉलमध्ये विंडो शॉपिंगवर समाधान मानावे लागले.मुंबई सेंट्रल, वरळी, लोअर परेल, कुर्ला, अंधेरी या प्रमुख ठिकाणांसह उपनगरांतील बहुतेक मॉलमध्ये बच्चेकंपनीसह मुंबईकरांनी हजेरी लावली होती. कॅशलेसवर विश्वास असलेले मुंबईकर गॅजेट्स, नामांकित हॉटेल आणि ब्रँडेड शोरूममध्ये खरेदी करताना दिसले. त्यामुळे पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा जवळ नसल्या, तरी क्रेडिट कार्डचा वापर करत, बहुतांश मुंबईकरांनी रविवारचा आनंद लुटला. याउलट गेल्या चार दिवसांत पुरेशी रक्कम हाती मिळालेले मुंबईकरही या ठिकाणी विंडो शॉपिंग करताना दिसले. तर आर्थिक कोंडीमुळे त्रासलेल्या मुंबईकरांनी नोटा बदलण्यासाठी आणि बँकेतून पैसा काढण्यासाठी लांबच लांब रांगा लावत रविवार सत्कारणी लावला.मॉलमध्ये झालेल्या गर्दीमुळे येथील शोरूम चालकांनाही दिलासा मिळाला. गेल्या चार दिवसांपासून ठप्प पडलेल्या व्यवहाराला चालना मिळाल्याचे दिसत होते. फास्ट फूडसह इलेक्ट्रॉनिक आणि कपड्यांच्या शोरूममध्ये तरुणाईने गर्दी केली होती. आश्चर्याची बाब म्हणजे, मुंबईतील नामांकित आणि मोक्याच्या ठिकाणी असलेल्या चित्रपटगृहांबाहेर शुकशुकाट दिसला, तर मॉलमधील चित्रटगृहांमधील सकाळचे खेळही हाउसफुल्ल होते. त्यामुळे चार दिवस घाम गाळून रोकड मिळवलेले मुंबईकर, एसीमध्ये विंडो शॉपिंग आणि खरेदी करत संडे मूड अनुभवत होते, तर काही मुंबईकर रविवारच्या दुपारीही बँकांबाहेरील रांगेत दिसले. (प्रतिनिधी)
मॉलमध्ये गर्दी, तर चित्रपटगृहे ओस
By admin | Published: November 14, 2016 5:40 AM