जालना : हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करीत जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर जिल्ह्यातील अन्सार शेख याने वयाच्या बाविसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली. अन्सारचे वडील रिक्षाचालक, तर लहान भाऊ हा किराणा दुकानात कामाला आहे. अन्सारच्या शिक्षणासाठी दोघांनी पैसे कमी पडू दिले नाहीत.बदनापूर तालुक्यातील शेलगाव हे अन्सारचे मूळ गाव. त्याला अनिस हा लहान भाऊ, तर नाजनीन व शबाना या दोन बहिणी आहेत. दोन्ही बहिणींचा विवाह झालेला आहे. मोठ्या बहिणीच्या पतीचा आजाराने मृत्यू झाला. अनेक वर्षांपासून अन्सारची आई अमजद बी आजारी आहे. त्याचे वडील शेख युनुस हे शेलगाव ते जालना रिक्षा चालवतात. त्यातून महिन्याला ६ ते ७ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने अनिसला आठवीनंतर शिक्षण सोडावे लागले. तो सध्या किराणा दुकानात कामाला आहे. त्याला महिन्याला ५ हजार रुपये पगार मिळतो. अन्सारच्या शिक्षणासाठी शेख युनुस यांनी घर आणि दुकान विकले. आठ वर्षांपासून हे कुटुंब भाडेतत्वावरील खोलीत राहत आहे. अन्सारचे प्राथमिक शिक्षण शेलगावच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. जालना शहरातील बारवाले महाविद्यालयात कला शाखेतून त्याने बारावीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पुण्याच्या फर्ग्युसन महविद्यालयातून कला शाखेतून पदवी संपादित केली. पुढे केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्याची त्याची मनीषा होती. त्यासाठी त्याने खासगी शिकवणी वर्ग लावला. बारावीपर्यंत शिक्षण घेत असताना अन्सार हा स्वत: शेतात कामाला जायचा. त्यातून झालेल्या अर्थाजनातून शिक्षणाची गरज पूर्ण करायचा, असे त्याचे वडील शेख युनुस यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (प्रतिनिधी)अन्सार लहानपासूनच तल्लख बुद्धीचा आहे. पहिलीपासूनच तो प्रथम क्रमांक मिळवायचा. पदवीपर्यंत अन्सार कधीच अनुत्तीर्ण झाला नाही. त्याच्या गुणवत्तेमुळेच संपूर्ण कुटुंब त्याच्या शिक्षणासाठी झिजले. तो यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याने कुटुंबाच्या मेहनतीचे चीज झाल्याचा आनंद आहे, अशी भावना अन्सारचे वडील शेख युनूस यांनी व्यक्त केली.
रिक्षा चालकाचा मुलगा बनला सनदी अधिकारी!
By admin | Published: May 11, 2016 4:03 AM