मुंबई : ‘घार उडे आकाशी चित्त तिचे पिलापाशी’ ही अवस्था कामावर जाणाऱ्या प्रत्येक मातेची असल्याने, उच्च न्यायालयाने त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांना व महिला वकिलांना दिलासा देण्यासाठी लवकरच उच्च न्यायालयाच्या इमारतीलगत असलेल्या सीटीओच्या इमारतीत पाळणाघर सुरू करण्याची घोषणा, बुधवारी महिला दिनानिमित्त मुख्य न्यायाधीश मंजुळा चेल्लुर यांनी एका कार्यक्रमात केली. त्यामुळे सर्व महिला कर्मचारी व महिला वकील यांच्या आनंदाला पारावर राहिला नाही. मे महिन्यापर्यंत हे पाळणाघर सुरू होण्याची शक्यता असल्याचे ‘अॅडव्होकेट असोसिएशन आॅफ वेस्टर्न इंडिया’चे (अवि) अध्यक्ष राजीव चव्हाण यांनी सांगितले.चिमुकल्यांना सोडून कामावर यावे लागत असल्याने, महिलांचे सर्व लक्ष घराकडे लागलेले असते. मुलांचा सांभाळ नीट केला जातो की नाही, या विवंचनेत असलेल्या महिलांना उच्च न्यायालयाने बुधवारी मोठा दिलासा दिला. महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात खुद्द मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर यांनी उच्च न्यायालयाच्या इमारतीलगतच असलेल्या मध्यवर्ती तारघराच्या (सीटीओ) इमारतीमध्ये लवकरच पाळणाघर सुरू करणार असल्याची घोषणा केली. गेल्या वर्षापासून आम्ही यासाठी पाठपुरावा करत आहोत. आता सर्व प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली असून, मे महिन्यापासून हे पाळणाघर सुरू होईल, असे अविचे अध्यक्ष राजीव चव्हाण यांनी दिली. (प्रतिनिधी)महिला दिनानिमित्त मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर यांच्यास हस्ते आॅलिम्पीयन धावपटू ललिता बाबर यांना ‘वुमन अचिव्हर आॅफ द ईअर’ हा पुरस्कार देऊन सन्मानित केले. चांदीचे सन्मानपत्र आणि अडीच लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या कार्यक्रमाला सर्व महिला न्यायाधीशांनी उपस्थिती लावली.
उच्च न्यायालयात सुरू होणार पाळणाघर
By admin | Published: March 09, 2017 1:24 AM