- चंद्रकांत कित्तुरेकोल्हापूर : चालू गळीत हंगामात डिसेंबरअखेर राज्यात ३९८ लाख ७७ हजार टन उसाचे गाळप झाले असून ४१ लाख १६ हजार ४८ टन साखरेचे उत्पादन झाले आहे. गाळपात पुणे विभाग तर उताऱ्यात कोल्हापूर विभाग आघाडीवर आहे.राज्यात २० आॅक्टोबरपासून गळीत हंगाम सुरू झाला असला तरी दिवाळीनंतरच त्याने गती घेतली. राज्यातील सहकारी ९९ आणि खासगी ८६ अशा १८५ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू आहे. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता ७ लाख ६६८० टन इतकी आहे. राज्यातील ७ विभागांपैकी पुणे विभागात सर्वाधिक ६२ कारखानेसुरू आहेत. या कारखान्यांनी १६९ लाख २५ हजार क्विंटल उसाचे गाळप करून १७ लाख ३८८ हजार टन साखरेचे उत्पादन केले आहे. या विभागाचा साखर उतारा १०.२७ टक्के आहे.त्याखालोखाल कोल्हापूर विभागात ३६ कारखाने सुरू असून त्यांनी ८३ लाख ४० हजार टनउसाचे गाळप करुन ९ लाख ५८१ टन साखरेचे उत्पादन केले आहे.कोल्हापूर विभागाचा साखर उतारा ११.४९ टक्के इतका तर राज्याचा साखर उतारा १०.४४ टक्के इतका आहे.राज्यात या हंगामात १०७.२३ लाख टन साखर उत्पादन होईल, असा सुरुवातीला अंदाज होता. मात्र, दुष्काळ आणि हुमणीचा प्रार्दुभाव यामुळे उत्पादनात घट येऊन ९५ लाख टनांपर्यंत साखर उत्पादन होईल, असा सुधारित अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.कोल्हापूर विभागात ऊस बिलांचा तिढागाळप हंगाम सुरू होऊन दोन महिने होत आले तरी कोल्हापूर विभागात शेतकºयांच्या हाती अद्याप ऊस बिले पडलेली नाहीत. एफआरपी एकरकमी देण्याला कारखान्यांनी असमर्थता व्यक्त करून सरकारकडे मदतीसाठी साकडे घातले आहे तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकरकमी एफआरपीच मिळावी यासाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यासंदर्भात कोल्हापुरातील साखर कारखानदारांची ५ जानेवारीला बैठक होत आहे. राज्यात अन्यत्र मात्र एफआरपीचे तुकडे पाडून काही कारखान्यांनी ८० -२० किंवा ८० -३० अशा स्वरुपात ऊस बिले देणे सुरू केले आहे.
गळीत हंगामात राज्यात यंदा ४१ लाख टन साखरेचे उत्पादन
By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2018 11:43 PM