मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेतून भरघोस उत्पन्न रेल्वेला मिळत असतानाच नेहमीप्रमाणे यंदाही प्रवाशांचे अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून होते. मात्र सर्वसाधारण अर्थसंकल्पातून हे स्पष्ट झालेले नसतानाच शुक्रवारी रेल्वे मंत्रालयाकडून माहिती देत मुंबईवर प्रकल्पांची खैरात केली. अर्थसंकल्पात एमआरव्हीसीच्या (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) सीएसटी-पनवेल फास्ट एलिव्हेटेड कॉरिडोर आणि विरार-वसई-पनवेल उपनगरीय कॉरिडोरला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे चर्चेत असणाऱ्या सीएसटी-पनवेल कॉरिडोरचे काम सुरू होऊ शकेल, अशी आशा आहे. तर चर्चगेट-विरार एलिव्हेटेड कॉरिडोरचाही यात समावेश करत त्याच्या काही छोट्या कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. एमआरव्हीसीने एमयूटीपी-३ प्रकल्प रेल्वेकडे मंजुरीसाठी पाठवल्यानंतर केंद्राकडून नुकतीच त्याला मंजुरी देण्यात आली होती. सीएसटी-पनवेल कॉरिडोर आणि विरार-वसई-पनवेल हे दोन प्रकल्प मात्र स्वतंत्ररीत्या मंजुरीसाठी पाठवले होते आणि या अर्थसंकल्पात त्याला मंजुरीही देण्यात आली. यातील विरार-वसई-पनवेल मार्गासाठी ८ हजार ७८७ कोटी रुपये खर्च येणार असून यंदा त्याच्या प्राथमिक कामांसाठी १0 लाख रुपयांची तरतूद केली आहे. तर सीएसटी-पनवेलसाठीही एवढ्याच रक्कमेची तरतूद करण्यात आली आहे. वांद्रे-विरार एलिव्हेटेड प्रकल्पाच्या काही किरकोळ कामांसाठी अवघे दहा हजार रुपये मिळाले आहेत. हा प्रकल्प सार्वजनिक-खासगी भागीदारीत केला जाईल. (प्रतिनिधी)वांद्रे ते विरार प्रकल्पअठरा स्थानके असून पाच भूमिगत स्थानके असतील. प्रकल्पाचा खर्च हा १६ हजार ३६८ कोटी रुपये अपेक्षित आहे. प्रकल्पामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकलचा बराचसा ताण कमी होण्यास मदत मिळेल.
सीएसटी-पनवेल कॉरिडोरला मंजुरी
By admin | Published: February 04, 2017 2:21 AM