पुणे : शाळा सुटल्यानंतर घरी निघालेल्या मुली चुकून दुसऱ्या मार्गावरच्या बसमध्ये चढल्यानंतर बस थांबविण्याची विनंती त्यांनी वाहकास (कंडक्टर) केल्यानंतर या मुलींना पाया पडायला लावणाऱ्या या वाहकास सोमवारी निलंबित करण्यात आले. नामदेव बन्सी दराडे असे या सेवकाचे नाव असून, गेल्या आठ वर्षांपासून तो पीएमपीमध्ये कार्यरत आहे. पीडित मुलींनी पालकांना याबाबत माहिती दिल्यानंतर त्यांनी ही मागणी केली होती. त्यानुसार, आज सकाळपासून कोणत्या बसमध्ये ही घडना घडली याची माहिती पीएमपीकडून घेण्यात येत होती. त्यानंतर दुपारी तीनच्या सुमारास हा वाहक दराडे असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.लष्कर भागातील मोदीखाना भागात असलेल्या अँग्लो ऊर्दू स्कूलमध्ये शिकणाऱ्या सहावी आणि सातवीतील सात मुली शनिवारी शाळा सुटल्यावर बसथांब्यावर उभ्या होत्या. सोलापूर बाजार येथील पुलगेटवरून त्या चुकून कोथरूडला जाणाऱ्या पीएमपी बसमध्ये चढल्या. बसच्या वाहकाने त्यांच्याकडे तिकिटाची मागणी केली, तेव्हा या मुलींनी त्यांच्याकडचा पास दाखवला. त्या वेळी वाहकाच्या तोंडाला ‘मास्क’ लावलेला होता. मुलींनी त्याच्याकडे मास्कबाबत चौकशी केल्यावर त्याने सर्दी झाल्यामुळे हा मास्क घातल्याचे सांगितले. त्याने या मुलींकडील पास चालणार नसून तिकीट काढावे लागेल, असे सांगितले. वास्तविक या मुलींकडचा पास शहरातील कोणत्याही भागामध्ये प्रवास करण्यासाठी वैध आहे. घाबरलेल्या दोन मुलींनी पटकन तिकीट काढून घेतले. अन्य चार मुलींकडे तिकीटासाठी पैसे नसल्यामुळे मुलींनी खाली उतरवण्याची विनंती केली. परंतु त्याने मुलींशी हुज्जत घालत त्यांचे पास जप्त केले. घाबरलेल्या मुलींनी खुप गयावया केल्यानंतर त्याने या मुलींना पाया पडायला सांगत त्यांचे पास परत केले. ही बाब समजताच रविवारी सकाळी सामाजिक कार्यकर्ते यासिन शेख, शकील शेख, अफरोझ शेख, अनीस शेख, वसीम शेख, सलाह शेख, गफूर शेख, सद्दाम शेख, अरबाज शेख, शारिक शेख यांच्यासह पालकांनी या प्रकाराची तक्रार केली.चालक, वाहकांना सूचनाया प्रकारानंतर पीएमपी प्रशासनाकडून सर्व डेपोंच्या प्रमुखांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत विद्यार्थी, महिला, विद्यार्थिनींना बसमध्ये प्राधान्य द्यावे, प्रवाशांशी गैरवर्तन करू नये अशा सूचना वाहक आणि चालकांना देण्याचे आदेश दिले. तसेच या पुढे असे प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक आगार प्रमुखांनी चालक व वाहकांच्या तातडीच्या बैठकाही घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुलींना शिक्षा करणारा वाहक अखेर निलंबित
By admin | Published: October 20, 2015 3:16 AM