पुणे, दि. 10 - राजकीय कार्यक्रमामुळे सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करावा लागल्याने पुन्हा एकदा बालगंधर्व रंगमंदिर वादाच्या भोव-यात सापडले आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी पहिले राष्ट्रीय पर्यावरण साहित्य संमेलन आवरते घ्यावे लागल्याने आयोजक आणि मान्यवरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. एकीकडे शासन पर्यावरण संवर्धनाचा आव आणत असताना दुसरीकडे पर्यावरण संमेलन गुंडाळायला लावण्यात आल्याने शासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आणि तेजस्विनी संस्थेतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात ८ ते १० सप्टेंबर दरम्यान पहिले राष्ट्रीय पर्यावरण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. रविवारी (१० सप्टेंबर) सकाळचे सत्र पार पडल्यानंतर दुपारी २ ते ३.३० या वेळेत ‘कचरा समस्या व उपाययोजना’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये राजेंद्र जगताप, सुरेश जगताप, श्यामला देसाई, ललित राठी, विनोद बोधनकर आदी मान्यवर उपस्थित राहणार होते.
दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी रंगमंदिरात प्रवेश करून दुपारचे सत्र रद्द करावे लागेल, अशा प्रकारची सूचना दिली. विचारणा करण्यात आली असता, दुपारी ४.३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम असल्याने सांगण्यात आले. या सत्रामध्ये सहभागी होणारे मान्यवर आणि प्रेक्षकांनाही रंगमंदिरात प्रवेश करु दिला जात नव्हता. पोलिसांना याबाबत विचारणा केल्यावर त्यांनी हुज्जत घालायला सुरुवात केल्याचे समन्वयक श्यामला देसाई, ललित राठी यांनी सांगितले.
पर्यावरण साहित्य संमेलनासाठी ६ जिल्ह्यांतून मान्यवर, पर्यावर तज्ज्ञ तसेच प्रेक्षक पुण्यामध्ये आले आहेत. संमेलन आवरते घ्यायला सांगण्यात आल्याने संयोजकांसह या व्यक्तींचीही अडचण निर्माण झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वीही अनेकदा राजकीय कार्यक्रमांसाठी नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करावे लागल्याची नामुष्की ओढावल्यानंतर अद्यापही महानगरपालिका याबाबत ठोस कारवाई करणार की मूग गिळून गप्प राहणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
बदलत्या काळात पर्यावरण संवर्धनाची नितांत गरज भासत आहे. यादृष्टीने पर्यावरण साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले. रविवारी दुपारचे सत्र अचानक रद्द करण्यासाठी सांगण्यात आले. याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता, व्यवस्थापक उपलब्ध नव्हते. राजकीय कार्यक्रमासाठी पर्यावरण संमेलन आवरते घ्यावे लागणे, ही बाब अत्यंत चुकीची आहे.- श्यामला देसाई, समन्वयक, पर्यावरण साहित्य संमेलन
-----------------
मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम ठरल्याने पर्यावरण साहित्य संमेलनातील कार्यक्रम रद्द करावे लागत असल्याची पूर्वकल्पना अध्यक्ष काळभोर यांना देण्यात आली होती. त्याबाबत महापौर कार्यालयाच्या कर्मचा-यांनी त्यांच्याशी संपर्कही साधला होता. त्यामुळे सभागृह रिकामे करण्याची सूचना आयत्या वेळी देण्यात आलेली नाही. संस्थेकडून केवळ ५,००० रुपये डिपॉझिट घेण्यात आले होते. उर्वरित रक्कम कार्यक्रमानंतर भरली जाणार होती. त्यामुळे संयोजकांचे आर्थिक नुकसान झालेले नाही.- प्रकाश आमराळे, व्यवस्थापक, बालगंधर्व रंगमंदिर