नाशिक : तळेगाव येथील बालिकेवरील अत्याचारानंतर उसळलेल्या हिंसाचारावर पोलीस प्रशासनाने दोन दिवसांत नियंत्रण आणल्यानंतर ग्रामीण भागातील अनुचित प्रकार टाळण्यासाठी जिल्ह्यातील आठ गावांत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दुपारी शहरात पोलिसांनी संचलन केले.नाशिक-मुंबई बस सेवेबरोबरच शहर आणि काही तालुक्यांची बससेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. इंटरनेट सेवा आणखी तीन दिवस बंद राहणार आहे. इगतपुरी तालुक्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. नाशिकमध्ये पोलिसांनी संचलन करून नागरिकांना आश्वस्त केले. बुधवारी त्र्यंबकरोड व सिन्नर फाटा येथे दोन बसेस फोडण्यात आल्या. त्यामुळे शहर बससेवेबरोबरच नाशिक, त्र्यंबकेश्वर, सिन्नर, इगतपुरी तालुका तसेच नाशिक - मुंबई बससेवा पूर्णत: बंद करण्यात आली आहे.मंगळवारी काही भागात दगडफेक झाली. त्या पार्श्वभूमीवर नाशिकरोडच्या नगरसेवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. सातपूर भागात दुपारपर्यंत संचारबंदीसदृश स्थिती होती, नंतर जनजीवन सुरळीत झाले. भगूर येथे धार्मिक कार्यक्रमाचा फलक फाडल्यावरून बुधवारी बंद पाळण्यात आला. दुपारी पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी विविध समाजाच्या नेत्यांची बैठक घेऊन शांततेचे आवाहन केले. विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर, खा. संभाजी राजे यांनी पीडित मुलीची भेट घेतली. (प्रतिनिधी)
नाशिक जिल्ह्यात आठ गावांत संचारबंदी
By admin | Published: October 13, 2016 7:13 AM