लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : नजीकच्या काळात मुंबईत सार्वजनिक सुव्यवस्था आणि शांतता भंग करुन मानवी जीवन व मालमत्तेस धोका पोहचविण्यात येणार असल्याच्या मिळालेल्या माहितीच्या आधारे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी शहरात १६ ऑक्टोबरपासून पुढील १५ दिवस जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. मुंबई पोलिसांच्या अभियान विभागाचे उपायुक्त संजय लाटकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे हे आदेश बजावले आहेत.
शिवसेनेत झालेली फाटाफूट, ठाकरे आणि शिंदे गट यांचे राजकारण, उभयतांना मिळालेली चिन्हे, त्यावर राज्यभरात उमटत असलेल्या प्रतिक्रिया आणि त्यात अंधेरी विधानसभेची होऊ घातलेली पोटनिवडणूक या सर्व पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आल्याचे बोलले जात आहे.
पोलीस उपायुक्त संजय लाटकर यांनी दिलेल्या आदेशानुसार, १६ ऑक्टोबरपासून ३० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत १५ दिवस हे आदेश लागू राहणार आहेत. यात पाच किंवा अधिक व्यक्तीच्या एकत्रित येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच, कोणतीही मिरवणूक आणि कोणत्याही मिरवणुकीत लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड वाजविण्यास आणि फटाके फोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. ३० ऑक्टोबरनंतर या आदेशाची मुदत संपली तरी, कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही सुरू केली जाऊ शकते. तसेच, ती सुरू ठेवली जाऊ शकते किंवा लागू केली जाऊ शकते. या आदेशाच्या कोणत्याही उल्लंघनाच्या संदर्भात झालेला कोणताही दंड, शिक्षा, जप्ती हा आदेश कालबाह्य झाला नसल्याप्रमाणे लागू केली जाऊ शकते, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
आकाश कंदिलावरही बंदीसुरक्षेच्या कारणास्तव १६ ते १४ नोव्हेबरपर्यंत आकाश कंदील उडविण्यावरही मुंबईत बंदी घालण्यात आली आहे. तसेच चायनीज कंदिलाच्या विक्रीसह त्याच्या साठा करून ठेवण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. दिवाळीत समुद्रकिनारी तसेच इमारतीच्या टेरेसवरून मोठ्या प्रमाणात नागरिकांकड़ून आकाश कंदील उडविले जातात. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर १८८ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.