- मेहरून नाकाडे रत्नागिरी : खासगी नोकरी करता करता कुतुहलातून प्रशासकीय सेवेचा मार्ग दिसला आणि त्यासाठी घेतलेल्या कष्टाने यशही मिळाले, अशी भावना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात १५ वा तर राज्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या नेहा भोसले हिने व्यक्त केली. खेड तालुक्यातील खोपी गावची कन्या असलेल्या नेहाशी, तिचा प्रवास आणि तिच्या यशाबाबत साधलेला थेट संवाद!प्रश्न : एमबीए पूर्ण केल्यानंतर युपीएससीकडे कशा वळलात?उत्तर : एमबीएनंतर दिल्ली येथील एका खासगी कंपनीत तीन वर्षे नोकरी करीत असताना, विविध प्रकल्प तयार करून सादरीकरण करण्याची संधी प्राप्त झाली. त्याचवेळी प्रशासकीय सेवेबाबत कुतूहल निर्माण झाले व केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) परीक्षेचा अभ्यास करण्याचे निश्चित केले. तातडीने नोकरीचा राजीनामा देऊन पूर्णपणे युपीएससीच्या अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत केले.प्रश्न : पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले का?उत्तर : हो, युपीएससीचा अभ्यास करण्यासाठी दिल्लीतच थांबले होते. तेथे मार्गदर्शन वर्ग लावला होता. दररोज दहा ते बारा तास अभ्यास सुरू होता. दोन वर्षांच्या अभ्यासानंतर मात्र पहिल्याच प्रयत्नात यश संपादन केले.प्रश्न : इंग्रजी भाषा व यूपीएससी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांमध्ये भीती आहे का?उत्तर : इंग्रजी भाषेविषयी अनेकांना न्यूनगंड असतो, मात्र तो असू नये. यूपीएससी ही भाषेची नाही, तर ज्ञानाची व व्यक्तिमत्वाची परीक्षा जरूर आहे. या परीक्षेसाठी पैसा खूप लागतो, असाही गैरसमज आहे. त्यापेक्षा योग्यवेळी योग्य मार्गदर्शन मिळणे महत्त्वाचे आहे. शहरीबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यूपीएससीचा अभ्यास करायचा असेल तर इंटरनेटवरही खूप सारी माहिती उपलब्ध आहे, शिवाय आॅनलाईन मार्गदर्शन वर्गही सुरू आहेत. मात्र योग्य पर्यायाची निवड महत्त्वपूर्ण आहे.शिक्षण मुंबईतनेहाचे आई-वडील मुंबईतच स्थायिक असल्याने तिचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण मुंबईत झाले. बारावी विज्ञान शाखेतून पूर्ण केल्यानंतर मुंबई विद्यापीठाची अभियांत्रिकीची पदवी विशेष प्राविण्यासह संपादन केली. इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट लखनौ येथे विशेष गुणवत्ता मिळवत एमबीए पूर्ण केले. तीन वर्षे नोकरी केल्यानंतर यूपीएससीची परीक्षा दिली आणि नेत्रदीपक यश मिळवले.नियोजन गरजेचेयूपीएससीचा अभ्यास कठीण नक्की आहे, परंतु ध्येय निश्चित केले की, यश हे मिळतेच. अर्थात त्यासाठी कष्ट करण्याची तयारी व वेळेचे नियोजन महत्त्वपूर्ण आहे. मी दररोज दहा ते बारा तास अभ्यास सुरू ठेवला होता. त्यासाठी दिल्लीतच जाण्याची गरज नाही, तर आॅनलाईन पीडीएफ स्वरूपातही माहिती उपलब्ध झाली. अर्थात अभ्यासावरच लक्ष केंद्रित करायला हवे, असेही ती आवर्जून सांगते.
कुतुहलाने दाखविला प्रशासकीय सेवेचा मार्ग- नेहा भोसले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 4:06 AM