अकोला : शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेसाठी उपयुक्त असे मित्र अॅप शासनाच्या शिक्षण विभागाने तयार केले असून, या अॅपचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विमोचन केल्यानंतर मित्र अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करण्यासाठी प्राथमिक शाळांमधील शिक्षक उत्सुक आहेत. अमरावती विभागातील तीन हजार ७०८ प्राथमिक शिक्षकांनी मित्र अॅप डाऊनलोड करून घेतले आहे. शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरावे आणि विद्यार्थी व शाळेसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविता यावे, या दृष्टिकोनातून शासनाच्या शिक्षण विभागाने शिक्षक मित्र अॅप तयार केले असून, या अॅपमध्ये शिक्षकांसाठी उपयुक्त माहिती उपलब्ध राहणार आहे, तसेच प्राथमिक व माध्यमिक शाळांना विद्यार्थ्यांच्या प्रगती व बौद्धिक विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबविता यावे, असे मार्गदर्शक तत्त्व अॅपमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. दररोज घडणाऱ्या घडामोडींसह ताज्या बातम्या, शालेय विद्यार्थ्यांसाठी कविता संग्रह, शिष्यवृत्तीची माहिती, आॅनलाइन टेस्ट डेमो, महत्त्वाच्या वेबसाइट, प्रश्नपेढी संच, माझी शाळासारखे महत्त्वाची माहितीसुद्धा मित्र अॅपद्वारे शिक्षकांना मिळणार आहे. शिक्षकांचा मित्र ठरेल, असेच हे अॅप तयार करण्यात आले असून, हे अॅप शिक्षकांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य विद्या परिषदेच्या वतीने मित्र अॅप तयार करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षकांना मित्र अॅपचा चांगला फायदा होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहेत. अॅपमध्ये मुलांच्या आवाजात कवितांचा आॅडिओ असून, विद्यार्थ्यांनी पुस्तकातील कविता वाचण्यापेक्षा त्या आॅडिओ एकूण म्हणाव्यात, असा प्रयत्न अॅपच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. शिक्षण विभागाने मित्र अॅप शिक्षकांसाठी नि:शुल्क उपलब्ध करून दिले आहेत. त्यामुळे मित्र अॅप डाऊनलोड करण्यासाठी शिक्षक उत्सुक असून, शेकडो शिक्षक दररोज आपल्या मोबाइलवर अॅप डाऊनलोड करीत आहेत. अमरावती विभागात १२ हजार प्राथमिक शिक्षक कार्यरत आहेत. त्यापैकी आतापर्यंत तीन हजारांवर शिक्षकांनी मित्र अॅप डाऊनलोड केले आहे. शिक्षण विभागाने शिक्षकांना उपयुक्त ठरेल, असे मित्र अॅप तयार केले असून, शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थी व शिक्षकांना अॅपचा चांगला उपयोग होईल. अकोला जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांना मित्र अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले असून, शिक्षकांना तर मित्र अॅप बंधनकारकच करण्यात आले आहे. -प्रशांत दिग्रसकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक.
‘शिक्षक मित्र अॅप’ डाऊनलोड करण्यास शिक्षक उत्सुक!
By admin | Published: May 04, 2017 1:42 AM