केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय घेतला. यामुळे उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला. पण या धक्क्यातून खचून न जाता पक्षाला सावरण्यासाठी आता उद्धव ठाकरे कामाला लागले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील शिवसेना भवनात पक्षाच्या जिल्हाध्यक्षांची बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि जिल्हाध्यक्षांना मार्गदर्शन केलं. यानंतर उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत शिंदे गट आणि अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"शिवसेना हे पक्षाचं नाव आणि चिन्ह चोरण्याचा प्रयत्न केला असला तरी हा पूर्व नियोजित कट आहे. ते ठाकरे नाव चोरू शकत नाहीत. मी एका गोष्टीसाठी भाग्यवान आहे... बाळासाहेब आणि मां च्या पोटी जन्माला आलो. ते भाग्य दिल्लीवाले देऊ शकत नाहीत" असं म्हणत उद्धव ठाकरेंनी खोचक टोला लगावला आहे.
"जी परिस्थिती शिवसेनेवर लादली ती देशातील कोणत्याही पक्षावर लादू शकतात. हे थांबलं नाही तर 2024 ची निवडणूक ही शेवटची निवडणूक ठरू शकते. आता जागे न झाल्यास हुकूमशाही. निवडणूक आयोगाचा निकाल अयोग्य आहे" असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आपल्या हातातून आता पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर पुढची रणनिती आखण्याआधी पक्ष संघटना मजबूत करण्यावर ठाकरे कुटुंब भर देणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे पक्षाच्या काही महत्वाच्या नेत्यांसोबत संपूर्ण महाराष्ट्र येत्या काळात पिंजून काढणार आहेत. यासाठीचं प्लानिंग केलं जात आहे.
महाराष्ट्राच्या दौऱ्यासाठी नेत्यांची एक टीम तयार केली जात आहे. यात आपले गड मजबूत ठेवण्याचं काम ठाकरे गटाकडून करण्यात येणार आहे. पक्ष सध्या ज्या परिस्थितीचा सामना करतोय अशा काळात निवडणुकीला खंबीरपणे सामोरं जायचं असेल तर गाव-खेड्यापासून पक्ष मजबूत करावा लागेल अशी भावना नेत्यांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंचे महत्वाचे नेते महाराष्ट्र दौरा करणार असल्याचं समजतं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"