मराठा आरक्षणाच्या मुद्द्याने संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. लोकसभा निवडणुकीत याचा मोठा फटका महायुतीला बसल्याचे मानले जाते. मात्र आता यावेळी विधानसभा निवडणुकीत मराठा समाज नेमका कुणासोबत महाविकास आघाडी की महायुती? याची चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. यासंदर्भात आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टशब्दात भाष्य केले आहे.
अजित दादा म्हणाले, "आजपर्यंत जेवढ्या निवडणुका झाल्या, त्यांत वेगवेगळ्या सर्वांसोबतच मराठा समाज राहिला आहे. इतर समाज एकतर्फी मतदान करतात. मात्र हा समाज असे कधी... कारण त्यांना राज्य चालवायचे आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचं राज्य आहे. एक आहे, जरांगेंचा काही परिणाम निश्चितपणे झालेला आहे. त्याचा फटका लोकसभेला विशेषतः मराठवाड्यात बसलेला आहे." दादा अबीपी न्यूज सोबत बोलत होते.
"विदर्भात तर देशमुखांनाही कुणबी सर्टिफेकेट आहे, आरक्षण आहे. तेथे डॉ. पंजाबराव देशमुख हायात असताना सर्वांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायला सांगितले. विदर्भाने प्रतिसाद दिला तेथे तो प्रश्न नाहीय. उत्तर महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर कुणबीची प्रमाणपत्र आहेत. कोकणातही कुणबीसमाज आहे. त्यांनाही कुणीबीची प्रमाणपत्र मिळातत. काही जणांनी कुणबीमध्ये लावून घेतलं नाही, कारण ते स्वतः आम्ही 96 कुळी आहोत, आम्ही नाही लावून घेणार, अशा पद्धतीने... काही ठिकाणी निवडणुकीला ओबीसीचं प्रममाणपत्र मिळावं म्हणूनही कुणबी लावून घेतल्याची उदाहरणंही आपल्यासमोर आहेत," असे अजित पवार म्हणाले. "देशाला स्वातंत्र्य मिळालं पण मराठवाड्याला निजामाच्या राजवटीत बराच काळ काम करावे लागले. यामुळे इतर भागाला जी संधी मिळाली तशी संधी मराठवाड्याला मिळाली नाही. यामुळे हैदराबादला जाऊन, त्याचे रेकॉर्ड आणून, नक्की काय आहे, काय करत होते, कुणबी म्हणजे कोण? तर जे शेतीवाडी करत होते, ते कुणबी, असे सर्व ते आहे. तेथे लोकांवर अन्याय झाला, अशी भावना निश्चितपणे आहे. ज्यांचा अभ्यास आहे त्यांचेही असे मत आहे. ते दुरुस्त करण्याचे काम आम्ही करत आहोत.