प्रगती जाधव-पाटील -- सातारा --भारतीय जेवणामध्ये सर्रास आढळणारा आणि जीवनसत्त्वांनी युक्त असलेला रेवडीचा सेंद्रिय शेतीतील कढीपत्ता मजल-दरमजल करत चक्क लंडनपर्यंत पोहोचला आहे. एसटीतील नोकरी सांभाळून पत्नी आणि बहिणीच्या मदतीने हणमंत कुचेकर यांनी ही शेती फुलविली.रेवडी या गावात हणमंत शंकर कुचेकर यांची वडिलोपार्जित शेती आहे. पूर्वी सर्वांच्याच सल्ल्याने या शेतात वेगवेगळी पिके घेतली जात होती. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांनी मित्राची कढीपत्त्याची शेती पाहिली आणि त्यांनी या पिकाकडे वळण्याचा निर्णय घेतला. धारवाड कृषी विद्यापीठाशी संपर्क साधून साताऱ्यातील रगाडे बापू यांच्याकडून त्यांनी कढीपत्त्याची रोपे मिळविली. कुचेकर यांनी ५० गुंठ्यात १ टनाहून अधिक उत्पन्न घेतले. त्यावेळी त्यांनी कढीपत्त्याची पाने मुंबईच्या एका व्यापाऱ्याला कवडीमोल भावात विकले. ‘आत्मा’ने त्यांना रोपांची काळजी, काटणी यापासून विपणन अशा सर्व पातळ्यांवर मदत केली. पारंपरिक कढीपत्त्याची पाने विकण्यापेक्षा प्रक्रिया करून त्याची पावडर केली तर उत्पन्नात वाढ होईल, असा सल्ला पणनतज्ज्ञ सायली महाडिक यांनी दिला. ‘आत्मा’कडून सवलतीत ‘सोलर ड्रायर’ घेऊन त्यांनी या व्यवसायाची सुरुवात केली. दर तीन महिन्यांनी कढीपत्त्याची कापणी होते. त्यांची पत्नी कांचन आणि बहीण संजीवनी या दोघीही दिवसाला दहा किलो कढीपत्त्याची पावडर करतात. शेतातून पाने कापून आणून ती सोलर ड्रायरमध्ये वाळवून मग त्याची पावडर करण्यात येते. ही आहेत औषधे --५० गुंठ्याच्या आपल्या शेतातील पिकाचे किडीपासून संरक्षण करण्यासाठी दशपर्णी अर्क, जीवामृत आणि शेणखताचा वापर करतात.एवढे लागते पाणी --कढीपत्त्याच्या रोपाची मुळे खूप लवकर खोलवर रूजतात. त्यामुळे याला फारसे पाणी लागत नाही. कुचेकर यांच्या शेताला कालव्यातून पाणी मिळते. तीन महिन्यांपूर्वी त्यांनी शेताला पाणी पाजले होते. त्यावर अद्यापही त्यांनी शेतात पाणी धरलेले नाही.मुंबई, पुणे अन् आता लंडन --कुचेकर यांनी कढीपत्त्याची पाने पहिल्यांदा मुंबईच्या बाजारात विक्रीस पाठविली. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथील एका कंपनीत पाने विकली. त्यानंतर पुण्यातील काही मॉलमध्ये त्यांनी कढीपत्ता पावडर विक्रीस ठेवली आणि आता सातासमुद्रापार लंडनला त्यांची पावडर जाणार आहे.उत्पन्नात अशी होते वाढ सध्या बाजारात कढीपत्त्याची पाने वीस ते तीस रुपये किलो दराने विकली जातात. जर ही पाने ड्रायरमध्ये वाळवून त्याची पावडर करून पिशवीबंद केली तर ही पावडर २० रुपये ५० ग्रॅम दराने विकली जाते. कढीपत्ता शेती पारंपरिक पद्धतीने करण्यापेक्षा त्यात आधुनिकतेची जोड देण्याचा आम्ही प्रयत्न केला. कुचेकर यांनीही त्याला साथ दिली. शासनाच्या सर्व आयात निर्यात निकषांवर खरे उतरल्यानंतर त्यांचा कढीपत्ता आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत जाणार आहे. - गणेश घोरपडे, प्रकल्प संचालक, आत्मा, सातारा.अनेक खाचखळग्यातून कढीपत्ता शेतीचा प्रवास झाला. पण जेवढ्या अडचणी अधिक तेवढेच यश मोठे या मताचा मी आहे. संकटावर मात करून मिळालेल्या संधीचे सोने केले. त्यामुळे माझ्या गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेता आले.- हणमंत कुचेकर, शेतकरी, रेवडी, सातारा
रेवडीचा कढीपत्ता लंडनच्या बाजारात
By admin | Published: January 15, 2016 10:34 PM