मुंबई : एकीकडे युतीची बोलणी सुरू असतानाच दुसरीकडे एकमेकांवर कुरघोडी करण्याचा खेळ सध्या शिवसेना, भाजपात सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ आणि ७०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करातून सवलत देण्याची घोषणा केली. त्यावर मालमत्ता करातील सवलतीबाबतची मागणी आपलीच असल्याचा दावा भाजपाने केला. उद्धव ठाकरे यांनी मातोश्री निवासस्थानी तातडीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा करून भाजपावर चांगलीच कुरघोडी केली. लवकरच शिवसेनेचा वचननामा जाहीर होणार असून त्यात मुंबईकरांना दिलासा देणाऱ्या मुद्द्यांचा समावेश केल्याचे उद्धव यांनी सांगितले. मुंबईकरांसमोर सध्या घर व आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांना मोफत आरोग्य सुविधा देऊ, असे ते म्हणाले. केंद्र व राज्य सरकारच्या सुविधांपासून वंचित राहिलेल्यांसाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आरोग्य कवच योजना सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मालमत्ता करातील सवलतींमुळे पालिका तिजोरीवर ताण पडणार नाही. अच्छे दिन हा केवळ चुनावी जुमला होता. आमची घोषणा जुमला नाही. आमचा वचननामा आहे, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)।५०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करमाफी५०० फुटांपर्यंतच्या घरांना उद्धव ठाकरे यांनी करमाफीची घोषणा केली. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीवर ४०० कोटींचा बोजा पडणार आहे. शिवाय, ७०० फुटांपर्यंतच्या घरांना सवलत दिल्यास त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी मुंबईत एकूण ४ हजार ९०० कोटींचा मालमत्ता कर वसूल झाला. सध्या मुंबईत ५०० फुटांपर्यंतची १५ लाख घरे आहेत. 600 चौरस फुटांपर्यंतची घरे मालमत्ता करमुक्त करावी, अशी मागणी सर्वप्रथम मी विधिमंडळ अधिवेशनात केली होती. त्याला राज्य सरकारनेही सकारात्मक प्रतिसाद दिला होता, असा दावा मुंबई भाजपाध्यक्ष आ. आशिष शेलार यांनी केला. शिवसेना, भाजपा युतीबाबत उद्धव यांना विचारले असता, युतीची बोलणी अजून माझ्यापर्यंत आलेली नाही. माझ्याकडे चर्चा आल्यावर मी माझा निर्णय जाहीर करेन. पण ही सकारात्मक चर्चा होकारात्मक होऊ द्या, असेही ते म्हणाले.।मुंबईकरांसाठी भाजपाच्याही घोषणामुंबई महापालिकेकडे साधारण १३ टक्के म्हणजे दरवर्षी सुमारे ५०० ते ६०० कोटी रस्ते करातून जमा होतात. तरीही रस्त्यांवर खड्डे आहेतच. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत रस्ते कर आकारणार नाही. मुंबईकरांना २४ तास पाणी मिळेपर्यंत पाणीपट्टीत सवलत दिली जाईल, असे शेलार यांनी सांगितले. महापालिकेतील करप्रणाली म्हणजे ‘कर दहशतवाद’च आहे, असा आरोप त्यांनी केला. या कर दहशतीतून मुंबईकरांची सुटका करण्यासाठी भाजपाच्या जाहीरनाम्यात सवलती दिल्या आहेत. लवकरच तो प्रकाशित केला जाईल, असे शेलार यांनी सांगितले.
युतीत कुरघोडी
By admin | Published: January 20, 2017 6:28 AM