कोल्हापूर : अन्नधान्य व नागरी पुरवठा म्हणजे सर्वसामान्य माणसाच्या जगण्याशी निगडित असलेले खाते. एक ग्राहक म्हणून या खात्याच्या मंत्र्यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी आलेल्या नागरिकांचा ग्राहक प्रबोधन मेळाव्यात पुरता भ्रमनिरास झाला. ग्राहक संरक्षणमंत्री गिरीष बापट यांनी अवघ्या दहा मिनिटांत हा कार्यक्रम अक्षरश: गुंडाळला.राज्य ग्राहक संरक्षण परिषदेच्या वतीने शुक्रवारी आयोजित ग्राहक प्रबोधन मेळाव्याचे उद्घाटन दुपारी एक वाजता गिरीष बापट यांच्या हस्ते झाले. राज्य ग्राहक संरक्षण परिषदेचे संजय पाटील यांनी दोन मिनिटांत बापट यांचा परिचय करून दिला. त्यानंतर आमदार अमल महाडिक बोलायला उठले कधी आणि पुन्हा खुर्चीवर येऊन बसले कधी, हेही कळले नाही. त्यांच्यानंतर गिरीष बापट बोलायला उठले. ‘ग्राहकांनो, संघटित व्हा, संघर्ष करा. रेशन दुकानदारांनी मापात पाप करू नये,’ असे आपले जुजबी भाषण त्यांनी अवघ्या दहा मिनिटांत संपविले. एखादे आश्वासन मिळेल, रेशनसंंबंधीच्या आपल्या तक्रारींची दखल घेतली जाईल, या आशेने आलेल्या नागरिकांना नेमकं काय घडतंय, हे कळायच्या आत ते निघूनही गेले. त्यांच्यामागे अधिकारीही गेल्याने व्यासपीठ रिकामे झाले. नागरिकही उठले. कार्यक्रमपत्रिकेतील अनेक अधिकाऱ्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरविली. मेळाव्यासाठी संयोजकांनी जिल्ह्यातून रेशन दुकानदारांना निमंत्रित केले होते. काहीजण अजून वाटेतच होते, तोपर्यंत कार्यक्रम संपला.या मेळाव्यासाठी कॉम्रेड चंद्रकांत यादव आपल्या संघटनेतील नागरिकांसोबत आले होते. मात्र, कार्यक्रमस्थळी काही वाद झाला आणि यादव आपल्यासोबतच्या सगळ्या मंडळींना घेऊन निघून गेले. या घटनेचा संजय पाटील यांनी व्यासपीठावरून निषेध केला. अशा रीतीने या मेळाव्याचा विचका झाला.
दहा मिनिटांत गुंडाळला ग्राहक मेळावा
By admin | Published: May 22, 2015 11:49 PM