मुंबई : कोणत्याही प्रकारची खरेदी करताना सतर्क राहून फसवणुकीपासून दूर राहावे, असे आवाहन मुंबई ग्राहक पंचायतीने जागतिक ग्राहक दिनी केले आहे. इंटरनेट व टीव्हीच्या वाढत्या वापरामुळे आॅनलाइन शॉपिंग आणि टेलिशॉपिंगचा पर्याय उपलब्ध झाला आहे. या भूलभुलैयात वावरताना सावध राहावे, असा सल्ला मुंबई ग्राहक पंचायतीने दिला आहे. आॅनलाइन शॉपिंगपेक्षा ‘टेलिशॉपिंग’च्या माध्यमातून होणारी फसवणूक अधिक आहे. येणाऱ्या एकूण ग्राहक तक्रारींपैकी २ टक्के तक्रारी ‘टेलिशॉपिंग’संदर्भात असतात, मात्र त्याचा निकाल लागण्याचे प्रमाण अत्यल्प आणि लागणारा कालावधी अधिक असल्याचे पंचायतीच्या ग्राहक शिक्षण विभागाच्या प्रमुख वसुंधरा देवधर यांनी सांगितले. टीव्हीवरच्या अनेक वाहिन्यांवर टेलिशॉपिंगचे शो सुरू असतात. अशा शोमधून अंधश्रद्धाही पसरवली जाते. अनेकदा ग्राहक या वस्तूंची खरेदी करून फसतात. या जाहिरातींमध्ये खुलेआम या वस्तू घ्याच, असे आवाहन केलेले असते. अशावेळी अनेकदा ग्राहक त्याला गरज नसतानाही या वस्तूंची खरेदी करतो. घरी आणल्यावर या वस्तू तशाच पडून राहतात. याचाही ग्राहकांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. तक्रारी सोडविण्यासाठी लागणारा वेळ हा खूप जास्त आहे. न्याय मिळायला वेळ लागतो. त्यामुळे ग्राहकाने सतर्क राहिल्यास फसवणूक होणार नाही. पटकन श्रीमंत होणे, सुंदर होणे, प्रयत्न न करता दैवामुळे मिळेल म्हणून काही यंत्र, खडे विकत घेणे असे प्रकार ग्राहकांनी टाळले पाहिजेत, असेही मुंबई ग्राहक पंचायतीने म्हटले आहे. (प्रतिनिधी)१) टेलिशॉपिंगच्या माध्यमातून वस्तू खरेदी करताना कोणत्या व्यक्तीकडून खरेदी करीत आहोत, हे ग्राहकाला माहीत नसते. या वस्तूची निर्मिती कुठे होते, याचेही ज्ञान नसते. २) अनेकदा ग्राहकांना ठरावीक मुदतीत सवलतीच्या दरात वस्तू मिळणार असल्याचे आमिष दाखवले जाते. अशावेळी प्रत्यक्षात त्या वस्तूची किंमत ग्राहकाने तपासून पाहण्याची आवश्यकता आहे. कारण त्या वस्तूची मूळ किंमत कमी असते. मात्र, ती वाढवून दाखविली जाते. ३) अनेकदा ग्राहकांच्या अंधश्रद्धांचा गैरफायदा घेत काही यंत्रे, अंगठ्या, पेंडंट्स किंवा खडे विकले जातात. त्यामुळे भाग्योदय होईल, असा दावा केला जातो. अशावेळी अनेकदा ग्राहकांचा भ्रमनिरास होतो.
ग्राहकहो, टेलिशॉपिंगच्या भूलभुलैयापासून सावधान
By admin | Published: March 15, 2016 12:48 AM