विवेक भुसे / पुणेनोटाबंदीनंतर चलनाचा तुटवडा निर्माण झाल्याने असंख्य वाहनचालकांनी डेबिड, के्रडिट कार्डचा वापर करून त्याद्वारे पेट्रोल भरण्यास सुरुवात केली़ केंद्र सरकारने ९ डिसेंबर रोजी कार्डद्वारे पेट्रोल-डिझेल भरल्यास पाऊण टक्का सवलत देण्याची घोषणा केली़ मात्र, ही सवलत तर दूरच, कार्डद्वारे पेट्रोल भरल्यास ग्राहकाला तब्बल ११़२४ रुपयांचा भुर्दंड पडत असून, ही रक्कम बँका सेवाकर म्हणून वसूल करीत आहेत़ यामुळे पुण्यात दररोज कार्डद्वारे पेट्रोल-डिझेल घेणाऱ्या ग्राहकांना तब्बल ३० लाख रुपयांचा भुर्दंड पडत आहे़ या सेवाकरामुळे बँका मालामाल झाला. कार्डवर पेट्रोल भरल्यानंतर बँकांकडून ग्राहकांना तातडीने मेसेज पाठविला जातो़ जेवढ्या रकमेचे पेट्रोल भरले, तेवढी रक्कम तुमच्या खात्यातून वजा केली असल्याचा मेसेज येतो़ त्यामुळे बहुसंख्य ग्राहकांना या रकमेवर बँका दामदुपटीने सेवाकर आकारत असल्याची माहितीच मिळत नाही़ ग्राहक बँकेत जाऊन पासबुक भरतो, तेव्हा लक्षात येते, की आपण २०० रुपयांचे पेट्रोल भरले असले, तरी प्रत्यक्षात बँकेने २११़२४ रुपये कापून घेतलेले आहे़ याबाबत आॅल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले, की बुधवारी सकाळीच किमान १५ जणांचे फोन आले. कार्डद्वारे पेट्रोल भरले तरी सवलत मिळाली नाही; उलट सर्व्हिस चार्जच्या नावाखाली दुप्पट पैसे गेल्याचे सांगितले़ पुणे जिल्ह्यात ५५०, तर पुणे शहरात ३५० पेट्रोलपंप आहेत़ देशभरात ५२ हजार पेट्रोलपंप आहेत़ या पेट्रोलपंपांवर २ लाख लिटर पेट्रोलची विक्री होत असून, दररोज सरासरी १,००० ग्राहक पेट्रोलपंपावर इंधन भरतात़ पेट्रोलपंपचालकाला २०० रुपयांच्या पेट्रोलविक्रीवर ५़८० रुपये कमिशन मिळते़ पेट्रोलची विक्री करणाऱ्या पंपचालकाला जेवढे कमिशन मिळते त्याच्या दुप्पट रक्कम ई-व्यवहाराची सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल बँकेला मिळत असल्याचे दिसून येते़ तसेच, हे सर्व्हिस चार्जचे दर प्रत्येक बँकेचे वेगळे आणि डेबिड व क्रेडिट कार्डसाठीचे दर वेगवेगळे असल्याचे दिसून येते़नाव न सांगण्याच्या अटीवर एका बँक अधिकाऱ्याने सांगितले, की वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे दर आहेत़ बँकांना ०़५ ते ७ टक्क्यांपर्यंत सर्व्हिस चार्ज घेण्याचा अधिकार आहे़ बँका आपले स्वाइप मशीन देताना पंपचालकांबरोबर करार करतात़ त्यात हा दर किती असेल, हे नमूद केलेले असते़; पण त्याकडे कोणीही लक्ष देत नाही़ आमच्या बँकेच्या ग्राहकांनी ज्या पेट्रोलपंपावर आमचे मशीन आहे तिथे पेट्रोल भरले, तरच त्यांना आमचा दर पडतो़ पण, त्यांनी दुसऱ्या बँकेच्या मशीनद्वारे पैसे अदा केले, तर ही अॅक्वायर बँक जास्त दर आकारते़ही तर लूट : पेट्रोलपंपचालकांच्या कमिशनपेक्षा सेवाकरासाठी दुप्पट रक्कम घेणे ही तर ग्राहकांची लूट असून, हा प्रश्न देशपातळीवर उठविणार आहोत़ केंद्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे हा सर्व्हिस चार्ज रद्द केला पाहिजे़, असे दारूवाला यांनी सांगितले. पेट्रोल डीलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, प्रत्येक पेट्रोल पंपावर सरासरी ८०० ग्राहक कार्डचा वापर करीत असतील, प्रत्येकाकडून ११ रुपये घेतले जातात. पुण्यात ३५० पेट्रोल पंप आहेत़ दररोज बँका सर्व्हिस चार्जच्या नावाखाली सुमारे ३० लाख रुपये ग्राहकांच्या खिशातून काढून घेत आहेत़ ग्राहकांच्या तक्रारी आल्याने बँकेच्या मुख्यालयातून हा सर्व्हिस चार्ज कशा प्रकारे आकारला जातो, आपली बँक किती आकारते, प्रत्यक्ष जास्त सर्व्हिस चार्ज का पडतो, हे ग्राहकांना समजावून सांगावे, असे पत्र आल्याचे एका बँक अधिकाऱ्याने सांगितले़
कॅशलेस पेट्रोलसाठी ग्राहकांना भुर्दंड
By admin | Published: December 22, 2016 3:38 AM