बारामती : दुष्काळी परिस्थिती तीव्र स्वरूप धारण करीत आहे. मराठवाड्यात पिण्यासाठी पाणी नाही. चारा, पाण्याचे संकट मोठे आहे. या संकटातून मार्ग काढण्यासाठी शेतकऱ्यांनी चारा साठवणुकीचे आधुनिक तंत्र आत्मसात करावे, असे आवाहन खासदार शरद पवार यांनी केले. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी व पशुसंवर्धन महाविद्यालय व नेदरलॅण्डच्या व्हेन हॉल लारेन्स्टाइन विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने दुग्ध तंत्रज्ञानावर आधारित ‘राक’ प्रकल्पाचा सामंजस्य करार करण्यात आला. त्याचे उद्घाटन शारदानगर येथे आयोजित कार्यक्रमात पवार यांनी केले. पवार म्हणाले, ‘‘येथील ट्रस्टच्या निर्मितीनंतर शेती, पाण्याबरोबरच व्यवसायाची संकल्पना पुढे आली. त्यानंतरच या परिसरात दुग्ध व्यवसाय वाढला. सुरुवातीला २५० ते ३०० लिटर असणारे दूधसंकलन १ लाख लिटरपर्यंत पोहोचले आहे. जगाच्या बाजारपेठेत दुग्धजन्य पदार्थ पाठविण्यासाठी शेतकऱ्यांना आता या कराराचा उपयोग होईल. दुग्ध उत्पादनात हा परिसर पुढे जाईल. भारत अधिक लोकसंख्येचा देश आहे. दुधामध्ये भारत प्रगत असला तरी एका गाईचे सरासरी दुधाचे उत्पादन मात्र खूपच कमी आहे. म्हणूनच जगातील अग्रेसर अशा नेदरलॅण्डच्या सहकार्याने आधुनिक तंत्रज्ञानातून आपल्या देशी गार्इंची पैदास उत्पादनक्षम करण्यावर भर द्यावा लागेल. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करावा. त्यानंतर आपल्याकडेही गायींच्या दुधाची सरासरी प्रतिदिन ४० ते ५० लिटर होणे शक्य आहे. या वेळी नेदरलॅण्डमधील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच युरोपियन युनियनचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार, गिया फार्म टेक्नॉलॉजीचे हेन्क व्हॅन डर वाल, डॉ. आर. के. इवेग आदींनी मनोगत व्यक्त केले. या वेळी विश्वस्त रणजित पवार, सुनंदा पवार, बारामती अॅग्रोचे सीईओ रोहित पवार, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य नीलेश नलावडे, समन्वयक प्रल्हाद जाधव आदींसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
चारा साठवणुकीचे तंत्र आत्मसात करा
By admin | Published: March 07, 2016 1:14 AM