ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 25 - इंटरनेटचा वापर करत असाल तर सावधान राहण्याची गरज आहे, कारण मुंबई, ठाणे तसंच पुण्यातील इंटरनेट सेवेवर सायबर हल्ला करण्यात आला आहे. डिस्ट्रिब्युटेड डिनायल ऑफ सर्व्हिसेस (डीडीओएस) चा हल्ला असून यामुळे इंटरनेट स्पीड कमी होत आहे. त्यामुळे तुमच्याकडे इंटरनेटच्या स्पीडमध्ये समस्या येत असेल तर तुमच्याही इंटरनेवर हल्ला झाल्याची शक्यता आहे.
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार मुंबई, ठाणे आणि पुणे या तिन्ही शहरातील इंटरनेट सेवेवर परिणाम झाला आहे. सायबर सेलकडे मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. मुंबई सायबर सेलचे महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला.
मुंबई, पुणे आणि ठाण्यात इंटरनेट पुरवणाऱ्या आयएसपी कंपनीच्या सर्व्हरवर हल्ला झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे इंटरनेट वापरणारे लॉग इन अचानक वाढतात. याचा फटका बसल्याने इंटरनेट सेवा बंद होते. युझर्सचा आयपी अॅड्रेस हॅक करण्यासाठी केला जातो. स्पॅमच्या माध्यमातून हे हल्ले होत असल्याने, याच्याशी निगडीत काहीही तक्रार असल्यास युझर्सनी सायबर सेलकडे संपर्क साधावा, असं आवाहन ब्रिजेश सिंह यांनी केलं आहे.