पुणे/मुंबई : इयत्ता बारावीचा मराठी पेपर फुटला नसल्याचा दावा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केला आहे. मात्र, व्हॉट्सअॅपवर पेपर व्हायरल झाल्याप्रकरणी मंडळाच्या मुंबई विभागामार्फत सायबर सेलकडे तक्रार देण्यात आली आहे. पोलीस तपासणी पूर्ण झाल्यानंतर पेपरबाबत निर्णय घेतला जाईल, असे मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी सांगितले. बारावीची मराठी विषयाची परीक्षा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका मिळाल्याने खळबळ उडाली होती. ही प्रश्नपत्रिका गुरूवारी १०.४५ वाजता अनेक विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर आली. त्यामुळे मराठीचा पेपर फुटल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, राज्य मंडळाने पेपर फुटला नसल्याचा दावा केला आहे. याविषयी माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष म्हमाणे म्हणाले, ‘‘मराठीचा पेपर फुटलेला नाही. व्हॉट्सअॅपवर पेपर व्हायरल झाल्याप्रकरणी मुंबई विभागाने सायबर सेलकडे तक्रार दिली आहे. हा पेपर व्हायरल कसा झाला, त्यामध्ये कोणाचा हात आहे, ही माहिती तपासात पुढे येईल. तपासणी अहवाल आल्यानंतर पेपरबाबत निर्णय घेण्यात येईल.’’ वॉट्स अपवर पेपर व्हायरल झाल्याचे प्रकार ज्या विभागात घडले, त्या संबंधित विभागीय मंडळाकडून सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. कॉपी पुरविणाऱ्यास एक हजार दंडपाथर्डी (जि. नगर): बारावी परीक्षेत मराठीचा विषयाच्या पेपरला आदर्श माध्यमिक विद्यालयात कॉपी पुरवणाऱ्या संदिप अशोक नितनाथ यास न्यायालयाने एक हजार दंड व कोर्ट उठेपर्यंत शिक्षा सुनावली. गुरुवारी परीक्षा केंद्रात कॉपी देताना नितनाथ यास पोलिसांनी रंगेहात पकडले होते. शुक्रवारी त्यास न्यायालयात हजर करण्यात आले़ आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर न्यायालयाने एक हजार रुपये दंड व कोर्ट उठेपर्यंत बसून राहण्याची शिक्षा दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)>वाशी पोलिसांत तक्रार मराठीचा पेपर व्हॉट्सअॅपवर फुटल्याप्रकरणी शुक्रवारी मुंबई विभागीय बोर्डाच्या वतीने वाशी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. सायबर सेलच्या मदतीने या घटनेबाबत तपास केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक, मुंबई विभागीय बोर्डाचे सहसचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी स्वत: पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
बारावी पेपर फुटीचा तपास सायबर सेलकडे
By admin | Published: March 04, 2017 5:52 AM